उघड्यावरील कत्तलखाने बंद करावेत
नाशिक : शहरातील अनेक ठिकाणी रविवारच्या दिवशी उघड्यावर जनावरांची कत्तल केली जात असल्याने सदर प्रकार बंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. महापालिकेकडून संबंधित दुकानदारांना वारंवार सूचना देऊनही या सूचनेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने याबाबतची नियमावली न पाळणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
पत्रावळी, द्रोण बनविण्यासाठी यंत्रभेट
नाशिक : तुळसाआई बहुउद्देशीय संस्थेत दिव्यांगाना कागदापासून पिशव्या, पत्रावळ बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. भाऊसाहेब कोकाटे यांनी या संस्थेला प्रेसमशीन भेट दिल्याने दिव्यांगांच्या प्रशिक्षणाला आधुनिकता लाभणार आहे. जागतिक अपंगदिनाचे औचित्य साधून मशीन भेट देण्यात आले. यावेळी मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, संस्थेच्या अध्यक्ष शोभा काळे, सचिन संगमनेरे, प्रसन्न राव, किशोर काळे, विजया तांबट, मंदाकिनी निकम, जयेश काळे आदी उपस्थित होते. आभार विशाल काळे यांनी मानले.