सुरगाणा : येथील नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी देण्यात यावा व शहरातील घनकचरा व्यवस्थापन सुरळीत सुरू राहावे यासाठी स्वच्छता कर्मचाºयांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजले असून, याकडे अतिरिक्त कार्यभार सांभाळत असलेल्या मुख्य अधिकारी यांचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. उघड्या चेंबरवर अद्यापही ढापे टाकण्यात आले नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी ठेकेदाराला ठेका देण्यात आला होता. हा ठेका वर्षाकाठी पंचवीस ते तीस लाख रुपयांचा असल्याची चर्चा असल्याने एवढ्याशा शहरासाठी एवढी मोठी रक्कम ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले आहे. जर खरोखर एवढी मोठी रक्कम ठेकेदाराला देण्यात येणार असेल तर त्याऐवजी स्वत: नगरपंचायतीने स्वच्छता कर्मचाºयांची संख्या वाढवून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येऊन घनकचºयाचे व्यवस्थापन केले जावे, अशी मागणी केली जात आहे. ठेकेदाराकडून काम बंद असल्याने गेले काही दिवस जागोजागी कचरा दिसून येत होता. मात्र मागील चार-पाच दिवसांपासून नगरपंचायतीचे तीन-चार स्वच्छता कर्मचारी येऊ लागले आहेत. त्यामुळे रस्त्यालगत साठणारा कचरा उचलला जात आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी फलकावर आणि भिंतींवर स्वच्छतेचा संदेश दिला आहे. मात्र काही ठिकाणी फलक फाटले असून, फलकाखालीच अस्वच्छता राहात आहे. कळवणचे मुख्य अधिकारी सचिन माने यांच्याकडे सुरगाणा नगरपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. मात्र माने हे कधी येतात- कधी जातात हे सर्वसामान्य जनतेला समजत नाही. ज्यावेळी एखादी मीटिंग किंवा ठेकेदरांची बिले काढायची असेल त्यावेळी ते येथे उपलब्ध असतात असे समजते. अशा अल्पवेळात सर्वसामान्य जनतेला ते वेळ देऊ शकत नाहीत. नागरिकांसाठी ते उपलब्ध राहू शकत नसल्याने अनेकांची कामे त्यांच्या सहीमुळे अडून पडतात. कचरा व्यवस्थापनेच्या बाबतीतही तेच झाले आहे. नागरिकांसाठी मुख्य अधिकारी सुटीवगळता नेहमी उपलब्ध राहावा यासाठी कायमस्वरूपी मुख्य अधिकारी देण्यात यावा आणि विकासाची कामे मार्गी लावावीत, अशी मागणी केली जात आहे.
सुरगाण्यात घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 10:42 PM
सुरगाणा येथील नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी देण्यात यावा व शहरातील घनकचरा व्यवस्थापन सुरळीत सुरू राहावे यासाठी स्वच्छता कर्मचाºयांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
ठळक मुद्देस्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी; कायमस्वरूपी मुख्य अधिकारी देण्याची मागणी