नाशिक : गतवर्षी १९ आॅक्टोबर २०१६ रोजी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील गोदापात्रात मृतदेह आढळून आलेल्या आकाश बाळू सूर्यवंशी (२२, रा़दुर्गानगर, पंचवटी) या युवकाच्या खुनाची उकल करण्यात शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनला यश आले आहे़ विशेष म्हणजे अहमदनगरच्या कुविख्यात चन्या बेग टोळीतील सराईत गुन्हेगारासह अशोकनगरमधील एका संशयिताचा यामध्ये समावेश असल्याचे समोर आले आहे़ याप्रकरणी पोलिसांनी संशयित निखिल संतोष गवळी (२५, सातपूर) यास अटक केली आहे़ अहमदनगरच्या चन्या बेग टोळीतील शार्पशूटर शाहरूख रज्जाक शेख (२५, रा़ खैरी निमगाव, ता़श्रीरामपूर, जि़अहमदनगर), सागर सोना पगारे (२२) व बारकू सुदाम आंभोरे (२१, दोघे रा. चितळी, ता़राहाता, जि़ अहमदनगर) यांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी रविवारी (दि़२२) इंदिरानगर, आनंदनगरमधील पार्वती अपार्टमेंटमधून सापळा रचून पकडले होते़ या तिघांकडून दोन गावठी पिस्टल, ४० काडतुसे, पाच मोबाइल व एक यामाहा दुचाकी असा ३ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला होता़ नगरच्या बेग टोळीतील सराईतांनी शहरात काही गुन्हे केले आहेत का याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर करीत होते़ पोलीस शिपाई योगेश सानप यांना शाहरुख शेख याने शहरातील गुन्हेगारांसोबत गंगापूर येथे युवकाचा खून केल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पोलिसांनी तपास करून सातपूर अशोकनगरमधून निखील गवळी यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता पंचवटीतील आकाश सूर्यवंशी या युवकाचा धारदार शस्त्राने वार करून त्याचा मृतदेह गोदापात्रात फेकल्याची कबुली त्याने दिली. तसेच हा खून आपले दोन साथीदार, शाहरुख शेख व त्याच्या एक मित्र अशा पाच जणांनी मिळून केल्याचे सांगितले़ किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली व त्यातून आकाशचा खून केल्याचे गवळीने पोलिसांना सांगितले़ सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, उपनिरीक्षक रवींद्र सहारे, पोलीस शिपाई योगेश सानप, बाळा नांद्रे यांनी ही कामगिरी केली़ दरम्यान, बेग टोळीने शहरातील आणखी काही गुन्हे केले आहेत का? त्याचे लोकप्रतिनिधी, सराईत गुन्हेगार यांच्याबरोबरच संबंध होते का? आर्थिक साहाय्य कोण करीत होते याचा पोलीस शोध घेत आहेत़
वर्षभरापूर्वीच्या सूर्यवंशी खुनाची उकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:26 PM