कळवण : नाशिक विभागाचे महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी कळवण तालुक्याचा दौरा करून आदिवासी भागातील कृषी व पोल्ट्री उद्योग क्षेत्रातील कृषी, पोल्ट्री उद्योगाची पाहणी करत अडचणी सोडवण्याची ग्वाही दिली.आनंद अग्रो उद्योग समूहाचे संचालक उद्धव आहेर यांच्या हिंगळवाडी व भऊर येथील युनिटला भेट देऊन त्यांनी संवाद साधला. पोल्ट्री उद्योग क्षेत्रातील अडचणी, समस्या त्यांनी जाणून घेतल्या. पोल्ट्री उद्योग क्षेत्रातील समस्यांची व अडचणीबाबत शासनस्तरावर शासनाकडे आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही यावेळी दिली. यावेळी आत्माचे संचालक सुभाष नागरे, पशुवैद्यकीय खात्याचे सहआयुक्त डॉ. शिरसाठ, तहसीलदार अनिल पुरे, तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा, रमेश पाटील उपस्थित होते. तालुक्यातील शेतकरी शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतकरी शेती व्यवसायात प्रगती व विकास करून शेतीचे उत्पादन घेत असल्याचे बघून डवले यांनी समाधान व्यक्त केले.कळवण तालुक्यात विविध राबविल्या जाणाऱ्या कृषी योजनांची माहिती तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा यांनी दिली. यावेळी स्ट्रॉबेरी, शेडनेट, फळबागा, शेती व्यवसायातील नवीन प्रयोग यांची पाहणी त्यांनी केली. (वार्ताहर)
कृषी उद्योगातील समस्या सोडवू
By admin | Published: December 17, 2015 11:09 PM