मालेगाव : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करून ब-सत्ता प्रकार म्हणून नोंदविलेल्या जमिनींचे भोगवटादार वर्ग-१ या धारणाधिकारामध्ये रुपांतरित करण्यासाठी तालुक्यातील काही प्रकरणे मूल्यांकनाअभावी प्रलंबित आहेत. शासनाच्या दरसूचीमधून सुटलेल्या मिळकतींचा समावेश होण्यासाठी पुढील पंधरा दिवसात कार्यवाही करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिल्या. ब-सत्ता प्रकारातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री भुसे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, नगर भूमापन अधिकारी जितेंद्र भिंगारदिवे, उपअधीक्षक भूमी अभिलेख भगवान शिंदे, सहायक दुय्यम निबंधक पी.एन.लहाने, एस.व्ही.वाघ, पी.डी.वाघचौरे, संजय दुसाणे, ॲड. सतीश कजवाडकर, बंडू माहेश्वरी आदी उपस्थित होते.
------------------------
महसूल व नगर भूमापन विभागाने समन्वय साधत सातबारा उतारा व मिळकत पत्रिकेमध्ये मेळ घालून नागरिकांना दिलासा देण्याचे काम करावे. सत्ता प्रकार बदलामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे, त्याचबरोबर नागरिकांचे देखील प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याने प्राधान्याने ही प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचनाही मंत्री भुसे यांनी यावेळी दिल्या.