कसबे सुकेणे : ओझरच्या टिळकनगर येथील हाइट आउट कॅफे या हॉटेलमधील ४२ हजार ५०० रुपयांचे साहित्य लांबविणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अवघ्या बारा तासांत मुद्देमालासह अटक केली. याप्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यांनतर पोलिसांनी चोराचा शोध घेऊन पोलिसी खाक्या दाखवून चोरीस गेलेला मुद्देमाल व आरोपीस डांबरवाडी येथून ताब्यात घेतले. लॉकडाऊनमुळे बंद असलेले ओझर शहरातील टिळकनगर येथील हाइट आउट कॅफे या हॉटेलचा गाळा फोडून अज्ञात चोरट्यांनी हॉटेलमधील पिझ्झा ओव्हन, गॅस सिलिंडर, इंडकशन, आईस्क्रीम रोल मशीन, मिक्सर अशा ४२ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेल्याची तक्रार शुभम ज्ञानेश्वर नवले यांनी ओझर पोलीस ठाण्यात दिली होती. सोमवार, दि. ७ रोजी ओझर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर अवघ्या बारा तासांत पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक इम्रान खान, गुन्हे शोध पथकाचे अहिरराव, अनुपम जाधव यांच्या पथकाने तपासाचे चक्र गतीने फिरवून ओझरजवळील डांबरवाडी येथून आरोपी संतोष मारुती दांडेकर (२५) यास ताब्यात घेऊन न्यायालयासमोर सादर करून पोलीस कोठडी मागवून घेतली. पोलीस कोठडीत चौकशीअंती आरोपीने गुन्ह्याची कबुली देऊन त्याच्याकडून सदरच्या हॉटेलमधून चोरी गेलेला चाळीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
अवघ्या बारा तासांत चोरीची उकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:10 AM