नाशिक : काही निर्णय गरजेनुसार स्थानिक पातळीवर घेतले जातात. त्याची प्रदेशपातळीवर पक्षाला कल्पना असतेच असे नाही; मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना प्रवेश आणि तिकीट देण्याबाबत पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेईल. नैतिकतेच्या विचारावरच याबाबत अंतिम निर्णय होईल, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी नाशिकला पत्रकार परिषदेत केले. नाशिकला सुरू असलेल्या पदवीधर निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी भाजपा प्रदेशचे प्रवक्ते माधव भंडारी, केशव उपाध्याय नाशिकला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभा, विधानसभेत भाजपाला विकासाच्या मुद्द्यावर बहुमत मिळाले असून, आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांमध्येही भाजपाचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा विकासच असेल, असे भंडारी यांनी सांगितले. जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. १० पैकी नऊ महापालिकेत भाजपाचा महापौर होऊ शकतो. तिच परिस्थिती जिल्हा परिषदांमध्ये असेल, असे त्यांनी सांगितले. २०१२ च्या तुलनेत नगरपंचायतींमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले. २०१२ मध्ये भाजपाचे ७ नगराध्यक्ष व ४ उपनगराध्यक्ष तसेच ३५० अधिक नगरसेवक होते. २०१७ च्या निवडणुकीत मात्र भाजपाचे अधिकृत ८० नगराध्यक्ष तसेच ११५० नगरसेवक निवडून आले आहेत. हीच परिस्थिती आता महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राहील, असे त्यांनी सांगितले. शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी पक्ष यांच्यासोबत युती करण्याबाबत चर्चा सुरू आहे; मात्र अद्याप युती झालेली नाही. युती झाली नाही तरी भाजपाने स्वबळावर सर्व ठिकाणी लढण्याची तयारी पूर्ण केली आहे. नाशिकला तर यापूर्वीच स्वबळावर लढण्याचे संकेत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिले असल्याचे सांगितले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागुल, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, सुहास फरांदे, सुरेश पाटील, हेमंत धात्रक, लक्ष्मण सावजी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
काही निर्णय गरजेनुसार घेतले जातात : भंडारी
By admin | Published: January 26, 2017 12:46 AM