नाशिक : उन्हाळ्याच्या दिवसात डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी तसेच लाइफ स्टाइल म्हणून तरुणाईत गॉगलची क्रेझ वाढत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या आकाराचे रंगबिरंगी गॉगलने शहरातील बाजारपेठ नेहमीच सजलेली असते. रस्त्यावर बाजूला, बसस्थानकांबाहेर स्टॉल्स आणि फेरीवाल्यांकडे गॉगल्सची जोरात विक्री सुरू आहे. मात्र, स्वस्तातल्या या निकृष्ट दर्जाच्या गॉगल्समुळे डोळ्यांना गंभीर स्वरूपाचे परिणाम होऊ शकतात, असा इशारा नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे गॉगल वापरण्यापूर्वी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी, तसेच शक्यतो नामांकित कंपन्यांचेच गॉगल वापरावे, असे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.
ही घ्या काळजी
केवळ रस्त्यावरचेच नव्हे तर दुकानातील गॉगल घेतानाही काळजी घेण्याची गरज असते. गॉगल समोर धरल्यास पलीकडील दृश्य स्पष्ट दिसायला हवे. जर ते दृश्य अस्पष्ट आणि चित्र-विचित्र दिसत असेल तो गॉगल फॉल्टी समजावा. नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट गॉगल विक्रीचे पेव फुटले आहे. या स्वस्तातील गॉगलमुळे डोळेदुखी, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे गॉगल घेताना तो नामांकित कंपनीचा असायला हवा.
डॉक्टरांचा सल्ला घेतला का?
कमी किमतीच्या गॉगलसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक व त्यावरचा रंगही निकृष्ट दर्जाचा असतो. सुमार दर्जाच्या या गॉगलमध्ये अल्ट्राव्हॉयलेट किरणांपासून संरक्षण देणारी सुविधा नसते. त्यामुळे बुब्बुळांना इजा होऊ शकते. यापासून बचावासाठी गॉगल घेताना डाॅक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
निकृष्ट गॉगलच्या वापरामुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोका असतो. महागडे गॉगल प्रत्येकाच्या खिशाला परवडत नाहीत, त्यामुळे फिक्या रंगातल्या काचांचे गॉगल घेण्यास हरकत नाहीत. पण हा गॉगल निकृष्ट दर्जाचा असेल तर डोळे आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. गाॅगल वापरण्यापूर्वी डोळ्यांची तपासणी करायला हवी.
डॉ. हेमंत नांगरे, नेत्ररोगतज्ज्ञ
तापमान ४० अंशांवर
राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नाशिकच्या तापमानातदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले असून उष्णतेमुळे डोळ्यांची जळजळ होणे व इतर समस्या उदभवत आहेत. त्यामुळे ठरावीक वेळेनंतर चेहरा आणि डोळे थंड पाण्याने धुण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.