नाशिक : ‘वांद्रे’ शासकीय विश्रामगृहावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या हाती लागलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या काही फाईलींचा संबंध नाशिक येथील काही अधिकाऱ्यांशी जोडला जात असून, त्यातही माजी सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) राहिलेल्या व सध्या खात्यातून बाहेर पडलेल्या एका अभियंत्याच्या बंधूशी संबंधित फाईली असल्याची चर्चा होत आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन व मुंबईत मंत्र्यांच्या बंगल्यांची देखभाल दुरुस्तीसंदर्भात कामे केल्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या काही फाईली अलीकडेच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने वांद्रे येथील शासकीय विश्रामगृहाच्या एका खोलीतून ताब्यात घेतल्या आहेत. या फाईलींमध्ये नाशिक व ठाणे येथे सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करण्यात आलेल्या काही कामांच्याही फाईली सापडल्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्यादृष्टीने चौकशीला सुरुवात केली असून, माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी राहिलेल्या बांधकाम खात्यातील माजी अभियंत्याच्या नातेवाइकांच्या नाशिकमध्ये कामे केलेल्या फाईलींचा त्यात समावेश आहे. या माजी अभियंत्याच्या मर्जीनेच नाशिकमध्ये त्याच्या नातेवाइकाला कामाचे ठेके मिळाले होते व त्याच्या दबावातूनच सार्वजनिक बांधकाम खात्याचे काही अधिकारी या ठेकेदाराला मदत करून त्याच्या फाईली ‘क्लिअर’ करीत होते. त्यामुळे नाशिकच्या कामाच्या फाईली ‘वांद्र्यात’ येण्याचे कारण काय, असा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला पडला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या काही फाईलींचा संबंध नाशिक येथील काही अधिकाऱ्यांशी जोडला
By admin | Published: February 20, 2015 1:30 AM