नाशिक : पळसे-शेवगेदारणा शिव रस्त्यावरील टेंभी मळ्याजवळ राहणाऱ्या कासार कुटुंबांच्या अंगणात बिबट्या चाल करून आला. यावेळी दुचाकीवर बसलेल्या चिमुकल्या समृध्दीला त्याने पंजा मारून ओढून नेण्याचा प्रयत्न केला; मात्र जवळच बसलेल्या धाडसी आजीबाईंनी थेट बिबट्याच्या समोर जात त्याचा प्रयत्न हाणून पाडला अन् आपल्या नातीला बिबट्याच्या तावडीतून सोडविले... अंगाचा थरकाप उडविणारा हा प्रसंग व बिबट्याचे रौद्ररूप अद्याप त्यांच्या डोळ्यांसमोर फिरत आहे. ‘काही तरी पुण्यचं आमच्या कामी आले, अन्यथा...’ असे सांगताना गजराबाईंच्या अश्रूंचा बांध फुटला.नाशिकमधील गोदाकाठालगत पळसे शिवारातील शेवगेदारणा शिवजवळ राहणा-या अंकुश कासार यांच्या गट क्रमांक ३१७मधील शेतीला लागून असलेल्या घराच्या पडवीत बुधवारी (दि.१०) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्याने हजेरी लावत त्यांच्या चिमुकल्या समृध्दीला जखमी केल्याची घटना घडली होती. आजी व नातीचे दैव बलवत्तर असल्यामुळे दोघीही बिबट या हिंस्त्र वन्यप्राण्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावल्या. चार वर्षीय समृध्दीच्या डोक्याला काही प्रमाणात जखमा झाल्या असून तिच्यावर उपचार करण्यात आले असून ती सुखरूप आहे. या घटनेने पळसे पंचक्रोशीला हादरवून सोडले आहे.शेवगेदारणाकडे जाणारा शिवरस्ता अत्यंत धोकेदायक असाच आहे. या पंचक्रोशीतील रहिवाशांचा हा प्रमुख रस्ता असून या रस्त्यानेच नागरिक ये-जा करतात. वर्दळीच्या या रस्त्यावर रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. रस्त्याच्या दुतर्फा मका, ऊस, द्राक्षाची शेती आहे. यामुळे या मळेभागातील रस्त्यावर सातत्याने बिबट्याचे दर्शन गावकऱ्यांना होत असते. बिबट्याने यापुर्वीही या भागातील पशुधनाला हानी पोहचविली आहे; मात्र मनुष्यावर कधी हल्ला केल्याचा प्रसंग घडला नसल्याचे पोलीस पाटील उज्ज्वला कासार यांनी सांगितले.बिबट्याचा हल्ला गजराबाई यांनी मोठ्या धाडसाने परतवून लावला असला तरी आ दुर्दैवी प्रसंग पुन्हा घडू नये, यासाठी वनविभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या रस्त्यावर पथदीप लावण्याची मागणी गणपत कासार, माणिक कासार, गणपत गायधनी, बालाजी एखंडे, रतन कासार आदिंनी केली आहे.गावक-यांनी सजग राहून खबरदारी घ्यावीगावक-यांनी संध्याकाळ होऊ लागताच आपल्या शेताचा बांध ओलांडून घर गाठावे. रात्रीच्यावेळीआपल्या लहान मुलांचीसुध्दा काळजी घेत त्यांना अंगणात एकटे सोडू नये. पशुधनदेखील उघड्यावर ठेवू नये. घराबाहेर अधिक प्रकाशव्यवस्था व शेकोटी पेटवून ठेवावी व शक्य झाल्यास ऊसशेतीला ज्यांची घरे लागून आहेत, त्यांनी घराभोवती चेनलिंक फेन्सिंगचे कुंपण करून घ्यावे, असे आवाहन उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी केले आहे. गावकºयांनी घाबरून न जाता सजग राहून खबरदारी घ्यावी, असे ते म्हणाले.---