नाशिक- मिशन बिगेन अगेन अंतर्गत नाशिक शहरातील बाजारपेठा खुल्या करण्यास महापालिकेन परवानगी दिली खरी परंतु सम- विषम तारखांनाच व्यवसाय सुरू करण्याच्या निर्बंधांमुळे अवघे पंधरा दिवसाच व्यवसायाला मिळत आहेत. त्यामुळे व्यापारी- व्यावसायिकांच्या अर्थकारणावर परिणाम झाला असून महापालिकेने हे निर्बंध तत्काळ हटवावेत अशी मागणी होत आहे.
दुकाने सुर करताना महापालिकेने सम विषम तारखांनाच दुकाने खुली करण्याची अट घातली आहे. मात्र सुरूवातीला सम तारखेला कोणती दुकाने उघडी ठेवायची आणि विषम तारखेला कोणती, याबाबत स्पष्टता नसल्याने गोंधळ झाला. वरून पोलीसांनी मेनरोड सारख्या बाजारपेठेत दुकाने बंद करण्यास सांगितल्याने अधिकच संभ्रम निर्माण झाला. तथापि, त्यानंतर महापालिकेने दुकानांसमोर सम- विषमचे स्टिकर लावले असून काही ठिकाणी रंगवून ठेवले आहे. तथापि, या पध्दतीमुळे केवळ पंधरा दिवस दुकान सुरू ठेवता येते. दुकानातील कामगारांना पंधरा दिवसाचे वेतन देता येत नाही त्यामुळे व्यापाऱ्यांना अडचण होते, परंतु त्यापेक्षा अधिक अडचण ग्राहकांची होते. मेनरोड, शिवाजी रोड, चांदवडकर लेन, सराफ बाजार, भांडी बाजार, कापड पेठेत ग्राहक गेल्यानंतर त्याला अनेक दुकानांमध्ये जाता तर येत नाहीच परंतु बाजारात गेल्यानंतर सम- विषमच्या नियमामुळे आवश्यक ते दुकान बंद असल्याचे दिसल्यावर त्याला परतावे लागते आणि प्रवासाचा भुर्दंड देखील सोसावा लागतो.
मुळात महापालिकेचे सम विषम तारखांचे धोरण बुचकळ्यात टाकणारे आहेत. मेनरोड, शिवाजीरोड, दही पुल, सराफ बाजार या भागात नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते आणि दुकान उघडे दिसलेच तर प्रशासन किंवा पोलीस दुकानदारांवर कारवाई करतात. परंत दुसरीकडे ही मध्य भागातील बाजारपेठ वगळता उपनगरात मात्र नियमांचे उल्लंघन होऊन देखील कोणतीच कारवाई होत नाही, अशी व्यवसायिकांची तक्रार आहे. त्यामुळे मध्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनाच त्याचा जाच का असा प्रश्न व्यापा-यांनी केला आहे.शहरात सम- विषमची अंमलबजावणी अत्यंत विनोदी पध्दतीने सुरू आहे. मेनरोड सारख्या बाजारपेठेत अरूंद गल्ली बोळात दुकाने असल्याने तेथे जो नियम लागू केला तो संपुर्ण शहरात लागू करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला दुकाने आणि दुसºया बाजूला घरे, शेती किंवा शासकिय कार्यालये असले तरी दुकाने नियोजनानुसार सम किंवा विषम तारखेलाच खुली करावी लागत असल्याने नियमाच्या अंमलबजावणीचे नेमके तर्कट काय असा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे कॉलेजरोड, गंगापूर रोड सारख्या ठिंकाणी अत्यंत रूंद रस्ता मध्ये दुभाजक असून देखील सम - विषमचा नियम लागू करण्यात आल्याने त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.