शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी
नाशिक : चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील अनेक आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीस आलेला केशर, हापूस आंबा वादळामुळे गळून पडल्याने त्याचे नुकसान झाले आहे. विशेषत: आदिवासी भागात त्याचे प्रमाण अधिक असल्याने या शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
औषध मिळत नसल्याने नाराजी
नाशिक : शहरातील विविध भागांतील मेडिकल दुकानांमध्ये अनेक औषधे मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काही नागरिक औषधांसाठी वारंवार दुकानांच्या चकरा मारत आहेत; पण त्यांच्या पदरी निराशा पडते. राज्य शासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करून औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
लस मिळत नसल्याने नाराजी
नाशिक : लसीकरण केंद्रांवर वारंवार चकरा मारूनही लस मिळत नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक नागरिक सकाळीच लसीकरण केंद्रांवर रांगा लावतात; पण लसींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने अनेकांना माघारी फिरावे लागते. याबाबत काही वेळा कर्मचाऱ्यांसमवेत नागरिकांचे वादही होतात.
किरकोळ विक्रेत्यांसमोर समस्या
नाशिक : लॉकडाऊनमुळे बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक बंद झाल्याने शहरातील किरकोळ भाजी विक्रेत्यांना माल मिळणे मुश्कील झाले आहे. या व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर आपला मोर्चा वळविला आहे; पण एकाच शेतकऱ्याकडे सर्व भाजीपाला मिळत नसल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच या व्यापाऱ्यांची मागणी कमी असल्यामुळे त्यांना माल देणे शेतकऱ्यांनाही परवडत नसल्याने भाजी बाजारातील विक्रेत्यांची संख्या कमी झाली आहे.
शहरात अवैध मद्यविक्री जोरात
नाशिक : लॉकडाऊनमुळे मद्यविक्रीची दुकाने बंद असल्याने अवैध मद्यविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक भागांत सर्रासपणे अवैध मद्य विक्री केली जाते. पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अवैध मद्यविक्रीला पोलिसांनी आळा घालावा, अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणे पोलिसांना माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हॉटेल व्यावसायिकांसमोर विविध अडचणी
नाशिक : मागील वर्षापासून अडचणीत सापडलेल्या हॉटेल उद्योगाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही व्यावसायिकांनी तर हॉटेल बंद करणे पसंत केले आहे. हॉटेलचे मेंटेनन्स आणि स्टाफ सांभाळणे अनेकांना कठीण झाले आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतरही ग्राहक येतात की नाही याबाबतही शासंकता व्यक्त केली जात असल्याने सध्या तरी पर्यायी व्यवसाय करण्याचा विचार अनेक जण करीत आहेत.