नाशिक : मागील आठवड्यात चाळीस अंशांच्या पुढे तापमान गेल्याने नाशिककरांना असह्य झाले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पारा कमी झाल्याने नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तापमान कमी नोंदले गेले असले तरी उन्हाचा चटका मात्र कायम असून, त्यातच विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत.सोमवारी ३८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली, तर रविवारी ३६ अंश तापमान नोंदले गेले होते. तब्बल तीन ते चार अंशांनी पारा खाली आल्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली असली तरी दुपारच्या सुमारास कडाक्याचे ऊन जाणवत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नाशिककरांकडून काळजी घेतली जात आहे. हवामान खात्याने राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येण्याचे भाकीत वर्तविताना त्याचा फटका अन्य शहरांनाही बसण्याची शक्यता वर्तविली होती.मात्र दोन दिवसांपासून तापमानात घट झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.
उन्हापासून काहीसा दिलासा; चटका कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 1:20 AM