नाशिक : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार सत्तेत राहायला नको, हा विरोधकांचा प्रयत्न असून त्यासाठी ज्या क्लृप्त्या करायच्या त्या सर्व वापरल्या जात आहेत. राणा दाम्पत्याच्या कृतीमागे नक्कीच कुणाचा तरी हात असून त्याशिवाय ते असे धाडस करू शकत नसल्याचा दावा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
राज्य सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असला तरी पोलीस सक्षमपणे ही परिस्थिती काबूत ठेवतील, त्याचा मला विश्वास असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडील माहितीच्या आधारे कृती केली असून त्यात चुकीचे काहीच नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
इन्फो
सोमय्यांना पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नव्हती
राणा प्रकरणात लोकप्रतिनिधी म्हणून सोमय्यांना पोलीस ठाण्यात जाण्याचा अधिकार असला तरी कस्टडीमधील व्यक्तीला भेटायला जायचे काहीच कारण नाही. तिथे जाऊन विनाकारण संघर्ष वाढवण्याचे काम त्यांनी करायला नको होते. मात्र जे झाले ते योग्य नाही. असे काय काम आहे की त्यांना वाय सुरक्षा देण्यात आली, त्याचा विचार करण्याची वेळ आली आहे. शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणात पोलिसांकडे आधीचे इनपुट होते. मात्र संपर्कात काही घोळ झाला होता. त्यातूनही आता कारवाई केली असून पोलिसांच्या बदल्यादेखील करण्यात आल्या असल्याचे वळसे पाटील म्हणाले
इन्फो
आधी मुख्यमंत्र्यांची सही, नंतर स्थगिती
कोणत्याही बदल्यांमध्ये राजी-नाराजी असतेच. मात्र, ज्या वेळेला बदल्या होतात, त्या गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्या सहीनेचं बदल्या होतात. मात्र, नंतर मुख्यमंत्र्यांना बदल्यांमध्ये फेरबदल करण्याचा विचार असेल आणि त्यांनी बदल्यांना स्थगिती दिली असेल तर त्यात काहीही चुकीचं नाही, असेही वळसे पाटील यांनी नमूद केले.
-