लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या ७०० क्यूसेक पाण्यामुळे ऐन उन्हाळ्यात सोमेश्वर धबधबा खळाळला असून, पर्यटकांना आनंदाची पर्वणी अनुभवयास मिळत आहे. एकलहरे औष्णिक केंद्रासाठी आवर्तन म्हणून गंगापूर धरणातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे कालपर्यंत कोरडेठाक पडलेले नदीचे पात्र आता खळाळत्या पाण्याने जिवंत झाल्यासारखे वाटते आहे. कोरडाठाक पडलेला सोमेश्वर धबधबा त्यामुळे पुन्हा एकदा भरभरून वाहू लागला आहे. उन्हाची काहीली होत असताना सोमेश्वर धबधब्याच्या रूपाने गारवा अनुभवण्याचा एक चांगला पर्याय आता नाशिककरांना तसेच पर्यटकांना मिळाला आहे. दुपारचे ऊन उतरल्यानंतर मुलांना घेऊन येथे येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.