संदीप भालेराव/चेतन ठाकरेनाशिक : पेठ तालुक्यातील दमणगंगा नदीच्या काठावर वसलेला देवळाचापाडा हा अतिदुर्गम भागातील छोटासा पाडा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही मूलभूत नागरी सुविधांसाठी झगडत असल्याचे भयावह वास्तव आहे. देवळाचापाडा गावाला जोडणारा कहांडोळपाडा ते देवळाचापाडादरम्यान रस्ताच नसल्याने पालकांकडून विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी कधी खांद्यावर, तर कधी मोठ्या भांड्यात बसवून नदीच्या छातीपर्यंत लागणाऱ्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करून शहर गाठावे लागत आहे.
पेठ शहरापासून साधारण १० ते १५ किमी अंतरावर असलेल्या देवळाचापाडा गावाला जोडणारा कहांडोळपाडा ते देवळाचापाडादरम्यान रस्ताच नाही. अनेकवेळा रात्रीच्या अंधारात, तर कधी मुसळधार पावसात रुग्णांना डोली करून दवाखान्यात आणताना रस्त्यातच जीव गमवावा लागल्याच्या, तर गरोदर स्त्रियांना जंगलातच प्रसूत होण्याच्या घटनाही घडत असतात. गत अनेक वर्षांपासून या गावाला पक्का रस्ता व्हावा, यासाठी येथील नागरिक वेगवेगळ्या माध्यमातून शासन दरबारी तसेच लोकप्रतिनिधींना साकडे घालत असले तरी, दरवर्षी पावसाळ्यात ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी गत होते. दमणगंगा नदीवर पूल नसल्याने या भागातील ८ ते १० गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. नदीवर पूल व रस्ता या दोन मूलभूत गरजा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात तरी पूर्ण होतील काय, अशी आर्त हाक नागरिक देत आहेत.
खासदार शिंदे यांचा फोन अन् यंत्रणेची धावपळ
पेठ तालुक्यातील दमणगंगा नदी पार करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याची बाब समजल्यानंतर ठाण्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी तातडीने नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांच्याशी संपर्क साधला. नदीवरील परिस्थितीबाबत माहिती घेत त्यांनी या ठिकाणी पूल बांधणे शक्य होऊ शकते का, याबाबतची विचारणा केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना पाठवून माहिती मागवून घेत असल्याचे शिंदे यांना कळविले. शुक्रवारी पेठ तहसीलदार यांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रवाहाच्या ठिकाणी पाठवून अहवाल मागितला.