नाशिक : गुलाबी गारव्याची रम्य सायंकाळ, गुलाबी साड्या-ड्रेस परिधान करून आलेल्या सखी, गुलाबी फुग्यांसह आसमंतात दरवळणारा महिला शक्तीचा माहोल, अशा वातावरणात सखींनी मैफलीसह संक्रांतोत्सव अनुभवला. निमित्त होते लोकमत सखी मंच व क्युरी मानवता कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ए जिंदगी गले लगा ले’ कार्यक्रमाचे. क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या प्रांगणावर शनिवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी अशोक बिल्डकॉनचे संचालक अशोक कटारिया, फ्रावशी अकॅडमीचे संचालक रतन लथ, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. राज नगरकर, सहायक पोलीस आयुक्त विजय पाटील, मिसेस इंटरनॅशनल नमिता कोहोक, व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्थेचे विश्वस्त बाळासाहेब गामणे, संचालक संपत वाघ, प्राचार्य अरुणकुमार द्विवेदी, गायक स्वप्नील बांदोडकर, ऋषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे आदिंच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आसमंतात गुलाबी रंगाचे फुगे सोडून आणि गुलाबी पोषाख परिधान केलेल्या सखींनी रिबनच्या आकारातील रिंगणात उभे राहून कॅन्सरमुक्तीचा संदेश दिला. ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी प्रास्ताविक केले. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ ही व्यसनाधिनता व त्याच्या परिणामांवर प्रकाश टाकणारी लघुनाटिका सादर केली. या लघुनाट्याची संकल्पना प्रा. कविता तांबे, प्रा. कुणाल मराठे यांची होती. प्रभा सामसुका यांनी सूत्रसंचालन केले. संक्रांतीचे वाण म्हणून प्रत्येक सखीला डॉ. राज नगरकर लिखित उपयुक्त पुस्तक, माहितीपत्रक आदि भेट देण्यात आले. या कार्यक्रमासाठी व्हेनू पार्टनर म्हणून क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षणसंस्था यांचे विशेष सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)
कधी तू रिमझिम झरणारी बरसात...
By admin | Published: February 06, 2017 11:56 PM