मालेगाव : तालुक्यातील शिरसोंडी येथील शेतकरी केवळ उत्तम पवार यांनी सोसायटीच्या कर्जाला कंटाळून २०१५मध्ये आत्महत्या केली. आधीच पत्नी वारलेली. त्यामुळे त्यांच्या पश्चात मुलगा वाऱ्यावर पडला असून, उदरनिर्वाहासाठी नाशकात नोकरी शोधत आपली उपजीविका भागवत आहे. दोन बहिणींचे लग्न झालेले आहे. घरात दोनच जण असताना वडील केवळ पवार यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. त्यामुळे मुलगा दीपक पवार एकटा पडला. त्यातून तो कसाबसा सावरला असून, नाशकात काम धंदा शोधत आज एका मेडिकल एजन्सीत दहा हजार रुपयांची नोकरी करून गुजराण करीत आहे.
वडिलांनी आत्महत्या केली त्यावेळी दीपक अवघा सोळा वर्षांचा होता. दहावीत शिक्षण घेणारा दीपक वडील गेल्याने एकाकी पडला. त्याला राज्य शासनाकडून एक लाख रुपयांची मदत मिळाली. कृषिमंत्री दादा भुसे यांनी दहा हजारांची, तर नाम संस्थेनेही पंधरा हजारांची मदत केली. चांदवडमधूनही दहा हजारांची मदत झाली. त्यामुळे काही दिवस कसेबसे गेले; परंतु पुढे संपूर्ण आयुष्य उभे होते. घरी केवळ २० गुंठे शेतजमीन. वडिलांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली त्यांनतर आता जीवन जगण्याचे आव्हान समोर उभे होते. त्याचे मेहुणे मेडिकल एजन्सीत काम करीत होते. त्यांनी नाशिकच्या गोळे कॉलनीत असलेल्या मेडिकल एजन्सीत काम मिळवून दिले.
कोट....
कसाबसा उदरनिर्वाह चालवतो आहे. आता मेडिकल दुकानात काम करतो. तेथे दहा हजार रुपये महिना मानधन मिळते. अजून लग्न झालेले नाही. त्यामुळे एकट्याचा खर्च भागतो; पण लग्न झाल्यावर संसाराचा गाडा ओढावा लागणार आहे. शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय नोकरी मिळवून द्यावी.
- दीपक पवार, शिरसोंडी, ता. मालेगाव
फोटो- ०९ दीपक पवार