नाशिक : दारणा नदीकाठच्या परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून बिबट्या कडून रात्री बाहेर पडणाऱ्या माणसांवर हल्ले देखील होत आहेत. मंगळवारी (दि.30) रात्री दहा वाजेच्या सुमारास येथील सामनगाव कोटमगाव रस्त्यावरील कवळे वस्तीजवळ असलेल्या एका वीटभट्टी लगत अमोल प्रल्हाद पेढेकर (१४) हा मुलगा शौचासाठी गेला असता बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. सुदैवाने हा मुलगा काटेरी झुडपांमध्ये पडल्याने बिबट्या मुलाला जखमी करू शकला नाही आणि अमोलचे प्राण वाचले.बिबट्याचा मुक्त संचार आणि माणसांवर सुरू असलेले हल्ले यामुळे मागील महिनाभरापासून दारणाकाठ दहशतीखाली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पातळीवरील या भागांमध्ये सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले असले तरीही त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नसून रेस्क्यू पथकाला वारंवार हुलकावणी देत असल्याने या भागातील नागरिक देखील हवालदिल झाले आहे.असलेल्या बाबळेश्वर ते दोनवाडे परिसरातील सर्व गावांमध्ये वन विभागाने अतिसतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे. या भागातील माणसांवरील हल्ले थांबावे यासाठी राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी सुद्धा सोमवारी या भागाला भेटी देत रेस्क्यू टीमला विविध सूचना केल्या या परिसरामध्ये एकापेक्षा अधिक बिबट्यांचा मुक्तसंचार असल्याचे शेतकरी सांगतात. नाशिक पश्चिम वन विभागाच्या रेस्क्यू टीमला मदत म्हणून बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे बचाव पथकदेखील दोन दिवसांपासून नाशकात तळ ठोकून आहेत. या पथकासोबत पशुवैद्यकीय अधिकारी हे पूर्णवेळ उपस्थित राहून बिबट्या दिसताक्षणी तात्काळ भुलीचे इंजेक्शन भरून देत त्याला बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
आज रात्री 10 वाजता ज्या ठिकाणी अमोल वर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तिथून दोन दिवसांपूर्वी सामान गावात पोलीस पाटील मळ्यात घडलेल्या घटनास्थळ उभ्या दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे दोनवाडे शिवारातून आता आपला मोर्चा सामनगाव कोटमगाव, मोहगाव या भागांमध्ये वळविण्याचे दिसून येते. दरम्यान अमोलला बिबट्याने जखमी केले नसल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले. बिबट्याने शौचासाठी बसलेल्या अमोलवर चाल केली मात्र तो या हल्ल्यात सुदैवानं बजावल्याचे ते म्हणाले.या भागातील पंचक्रोशीत बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांनी संध्याकाळी नंतर घराबाहेर पडू नये तसेच आपल्या लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाच्या पथकाद्वारे ध्वनीक्षेपकावरून सातत्याने केले जात आहे. नागरिकांनी याबाबत कुठल्याही प्रकारची उदासीनता न दाखवता गांभीर्यान वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि बिबट्या जेरबंद करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे बिबट्याचे माणसांवरील हल्ले रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहात संध्याकाळनंतर घराबाहेर पडू नये. वन विभागाचे दोन्ही पथके या भागांमध्ये सातत्याने गस्तीवर असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन नाशिक वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी केले आहे.