नाशिक - अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांड खटल्यातील सातपैकी सहा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी सोमवारी (15 जानेवारी) दोषी ठरविले तर एकाला निर्दोष ठरविले. दोषींना 18 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे या आरोपीना फाशी की जन्मठेप याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या खटल्यातील 53 साक्षीदार तपासण्यात आले आहेत.
या हत्याकांडप्रकरणी न्यायाधीश वैष्णव यांनी संशयित प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे, संदीप कुरहे यांना दोषी ठरविले तर अशोक फलके यास निर्दोष ठरविले.
नेवासा फाटा येथील घाडगे-पाटील महाविद्यालयातील एका मुलीचे मेहतर समाजाच्या मुलावर प्रेम होते. या प्रेमप्रकरणातून जानेवारी 2013 मध्ये सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे संदीप राज धनवार (वय 24), राहुल कंडारे (वय 26), सचिन घारू (वय 23) या तीन तरुणांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. हे तिघेही नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये कामाला होते. त्यांना स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे असे सांगून विठ्ठलवाडी येथे बोलावून घेण्यात आले. धनवार व कंडारे यांचा खून करून त्यांचे मृतदेह पोपट दरंदले यांच्या कोरड्या विहिरीत पुरण्यात आले, तर घारू याचे मुंडके व हातपाय अडकित्त्याने तोडून कूपनलिकेत टाकून देण्यात आले होते.
या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी संशयित प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक रोहिदास फलके, अशोक नवगिरे, संदीप कु-हे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे़ नेवासा सत्र न्यायालयात खटला सुरू असताना साक्षी पुराव्याच्या वेळी साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो या शक्यतेमुळे तो नाशिक किंवा जळगाव न्यायालयात चालवावा, अशी विनंती याचिका मृताचे नातलग पंकज राजू तनवार यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. सुनावणीअंती खंडपीठाने याचिकाकत्यार्चे मुद्दे, म्हणणे ग्राह्य धरून त्यांची विनंती मान्य केली व हा खटला नेवासा सत्र न्यायालयातून वर्ग करून नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्याचे आदेश दिले होते.
जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश वैष्णव यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज झाले. सरकारी वकील उज्ज्वल निकम 1 जानेवारीला आरोपींच्या युक्तिवादाला उत्तर दिल्यानंतर या खटल्याची 15 जानेवारी ही तारीख देण्यात आली होती.