नाशिक : विघ्नहर्ता गणरायाचे धूमधडाक्यात आगमन झाल्यानंतर सर्वत्र आनंदोत्सवास प्रारंभ झाला असून, या आनंदात आणखी वाढ करणाºया गौरींचेही गुरुवारी (दि.५) घरोघरी सोनपावलांनी आगमन झाले. गौरी आणताना ‘गौरी कशाच्या पाऊली आली, सोन्या-मोत्याच्या पाऊली आली’, असे म्हणत गौराईला वाजत-गाजत उत्साहाच्या वातावरणात घरी आणून स्थापना करून भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला.लाडक्या बाप्पांचे सोमवारी (दि.२) सर्वत्र जल्लोषात स्वागत झाले. गणरायाच्या आगमनानंतर सर्वत्र गौरींच्या आगमनाची चाहूल लागली होती. यासाठी महिला गेल्या काही दिवसांपासून विविध कामात मग्न होत्या. त्यामुळे गुरुवारी महिला सकाळपासूनच गौरींच्या स्वागतासाठी आतूर झाल्या होत्या. गौराईचे पारंपरिक पद्धतीने आणि सोनपावलांनी आगमन झाल्यानंतर महिलांच्या उत्साहाला उधाण आले. गौरीला सजविण्यासाठी, तिला साजशृंगार करण्यासाठी महिलांनी विशेष परिश्रम घेतले. त्यामुळेच गौरींचे आगमन हा महिलांमध्ये उत्साह व चैतन्य निर्माण करणारा दिवस ठरला. गेल्या चार-पाच दिवसांपासून घराघरांमध्ये मिष्टान्न तयार करण्याची लगबगही सुरू होती. घराघरांत गौरींची उत्साहात पूजा करण्यात येत आहे. या गौरींना बाजूबंद, लक्ष्मीहार, सुवर्णजडीत कंबरपट्टे, बोरमाळ, हार तसेच सोन्याचे विविध प्रकारचे दागिने घालून सजवण्यात आले. दुसºया दिवशी शुक्रवारी (दि.६) गौरींचे पूजन करण्यात येणार आहे. यावेळी काही घरांत पुरणाच्या पोळीच्या नैवेद्यासोबत जेवणाचा बेत आखण्यात येणार असून, वेगवेगळ्या कुटुंबांतील परंपरेनुसार गोड, तिखटाचा नैवेद्य गौराईला दाखवण्यात येणार आहे. दरम्यान, गौरीच्या आगमनाबरोबरच घरात झिम्मा फुगडी, बस फुगडी आदी महिलांचे विविध खेळ रात्रभर सुरू राहणार असून, घरोघरी आलेल्या माहेरवाशिणींसोबत रात्र जागविण्याची परंपरा आजही उत्साहात चालविली जाते.
सुखसमृद्धीसाठी आराधना गौरी गणपती घरी येणे म्हणजे म्हणजे एकप्रकारे सुखसमृद्धी घरी येणे मानले जाते. त्यामुळेच गौरींच्या आगमनाच्या दिवशी घराच्या दारात आल्यावर गौरींच्या मुखवट्यावर तांदूळ, पाणी ओवाळून टाकले जाते. त्यानंतर घरातील प्रत्येक खोलीत नेऊन तिला संपूर्ण घर दाखविण्यात येते. ही परंपरा पार पाडताना काही महिलांनी ‘गौरी गौरी कुठे आलात’ असे विचारून तर काही महिलांनी ‘मी माझ्या माहेरी आले’ असे सांगत गौरीचे स्वागत केले.