नाशिक : आपल्या सुपुत्रांची कोरी पाटी घेऊन त्यावर राजकारणाची मुळाक्षरे गिरवू पाहणाऱ्या काही पित्यांची सत्त्वपरीक्षा यंदा महापालिका निवडणुकीत पहायला मिळणार आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत पुत्रांची चढाई पित्यांच्या राजकीय अस्तित्वाच्या लढाईत कितपत यशस्वी होते, हे येत्या २३ फेबु्रवारीला सिद्ध होईल. परंतु, एकूणच होणाऱ्या लढती पाहता आपला राजकीय वारसदार ठरविण्यासाठी चाललेली ही धडपड मातब्बरांच्या उरात धडधड वाढविणारी आहे. महापालिका निवडणुकीत यंदाही घराणेशाहीचे दर्शन घडत आहे. अनेक लक्षवेधी लढतींमध्ये काही लढती या राजकारणातील मातब्बरांसाठी प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. महापालिका निवडणुकीत काही मातब्बरांनी राजकीय वारसदार निश्चित करण्यासाठी आपल्या सुपुत्र-सुकन्यांना उतरविले आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांचे सुपुत्र मच्छिंद्र सानप भाजपाकडून उमेदवारी करत आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे नगरसेवक समाधान जाधव लढत देत आहेत. प्रभाग ५ मध्ये राष्ट्रवादीचे माजी खासदार माधवराव पाटील यांचे सुपुत्र संजय पाटील भाजपाचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर उपमहापौर गुरुमित बग्गा यांचे आव्हान आहे. प्रभाग ८ मध्ये भाजपाचे नगरसेवक दिनकर पाटील यांचे सुपुत्र अमोल पाटील यांची लढत सेनेचे नगरसेवक विलास शिंदे यांच्याशी आहे. प्रभाग ९ मध्ये माजी महापौर दशरथ पाटील यांनी त्यांचे सुपुत्र प्रेम पाटील यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले आहे. प्रेम पाटील यांची लढत थेट त्यांचे काका दिनकर पाटील यांच्याशी होणार आहे. त्यामुळे याठिकाणी काका-पुतण्याचा सामना चुरशीचा पहायला मिळण्याची शक्यता आहे. प्रभाग १२ मध्ये कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व नगरसेवक उत्तमराव कांबळे यांचे सुपुत्र समीर कांबळे लढत देत आहेत. त्यांच्यासमोर भाजपाचे बंडखोर उमेदवार व माजी नगरसेवक सुरेश पाटील आणि भाजपाचे हेमंत धात्रक यांचे आव्हान आहे. प्रभाग १५ मध्ये माजी आमदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी सुपुत्र प्रथमेश गिते यांना निवडणुकीच्या फडात उतरविले आहे. प्रथमेश याच्यापुढे एकेकाळी वसंत गिते यांचे समर्थक राहिलेले व मनसेतून कॉँग्रेसमध्ये गेलेले नगरसेवक गुलजार कोकणी आणि सेनेचे नगरसेवक सचिन मराठे यांचे आव्हान आहे. गिते यांच्या राजकीय अस्तित्वासाठी ही लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे. प्रभाग १६ आणि प्रभाग १७ मधून माजी महापौर अशोक दिवे यांचे दोन्ही सुपुत्र निवडणूक लढवत आहेत. प्रभाग १६ मध्ये विद्यमान नगरसेवक राहुल दिवे यांची भाजपाचे विद्यमान नगरसेवक प्रा. कुणाल वाघ व माजी नगरसेवक विजय ओहोळ यांचेशी लढत आहे. प्रभाग १७ मध्येही प्रशांत दिवे हे भाजपा नगरसेवक सुनंदा मोरे व माजी नगरसेवक शशिकांत उन्हवणे यांच्या समोर रिंगणात आहेत. सुपुत्रांना राजकारणाचा सामना खेळविताना पित्यांची मात्र मोठी कसोटी लागणार असून, वारसदारांची दांडी पहिल्याच चेंडूत उडू नये, याची पुरेपुर काळजी वाहिली जात आहे.
पुत्रांची चढाई; पित्यांची लढाई
By admin | Published: February 12, 2017 11:40 PM