नाशिक : परिसरातील रस्त्यांवरून महिलांना भरदिवसा पायी फिरणे मुश्कील झाले आहे. कधी कोण भामटे दुचाकीवरून येतील अन् गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा करतील या धास्तीने महिलावर्गात भीतीचे वातावरण पसले आहे. या महिनाभरात सोनसाखळी चोरीच्या या भागात सर्वाधिक पाच घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये २ लाख २ हजार रूपयांचे दागिणे चोरट्यांनी लांबविले आहेत.पहिली घटना राजीवनगर भागात घडली. चोरट्यांनी अत्यंत धाडसी पध्दतीने व नेहमीपेक्षा वेगळ्या रितीने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. फ्लॅटचा दरवाजा ठोठावून दरवाजा उघडण्यासाठी आलेल्या मीनाक्षी केसरकर यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरटे इमारतीतून फरार झाले होते, ते अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. तसेच दुसरी घटना चार दिवसांच्या अंतराने पुन्हा घडली. राणेनगरकडून राजीवनगरच्या प्रमिला सुभाष झेंडे या सकाळी दहा वाजेच्या सुमारास पायी जात होत्या. जाजू शाळेजवळ समोरून आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून पळ काढला, याबाबत पोलीस अजूनही तपास करत आहेत. तीसरी घटना दोन दिवसांनी शुक्रवारी (दि.१७) चार्वाक चौक परिसरात पुन्हा घडली. चोरट्यांनी दुचाकीवरून येत लता करपे नावाच्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. या घटनेचा तपास सुरू होत नाही तोच रविवारी (दि.१९) पुन्हा चोरट्यांनी पोलिसांना आव्हान देत चार्वाक चौकातच सुवर्णा घोलप नावाच्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र लांबविले. या घटनेला दोन दिवस होत नाही तोच पुन्हा गजानन महाराज मंदिराजवळ चार्वाक चौकापासून काही मीटर अंतरावर मंगळवारी (दि.२१) सुनीता चंद्रकांत दुसाने (४५) यांच्या गळ्यातील ४५ हजार रूपये किंमतीचे १६ग्रॅमचे मंगळसुत्र चोरट्यांनी पळविले.
पोलीस गस्त असूनही चोरटे मोकाटया पाच घटना केवळ बारा ते पंधरा दिवसांत घडल्या असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इंदिरानगर भागात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असून या भागात महिला वर्ग सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडतो. पोलिसांकडून कान-नाक समिती, निर्भया पथक, पायी पेट्रोलिंग, साध्या वेशातील पोलिसांची गस्त असे विविध ‘उपक्रम’ सुरू असूनदेखील इंदिरानगरमध्ये घडणारे गुन्हे कमी होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लागोपाठ घडणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटनांनी इंदिरानगरवासी हादरले आहेत.