नाशिक : शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सोमवारपासून अनलॉक केल्यानंतर बाजारपेठेतील सर्वच ठिकाणी ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. दुकानांची वेळ दुपारी ४ वाजेपर्यंत असल्याने यापूर्वी उडणारी झुंबड कुठेही दिसून आली नसली तरी, शहरातील अनेक मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली होती.
नाशिक जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आल्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये सायंकाळी ४ वाजेपर्यंत वर्दळ झाली होती. सर्व प्रकारची दुकाने उघडल्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांमध्ये चढाओढ दिसून आली. कापड दुकानांपासून भांडी बाजार तसेच रेस्टॉरंट, मोबाईल, कारडेकोर, होजिअरी, गॅरेजेस, तसेच बुक स्टॉल्समध्ये विशेष गर्दी झाली होती. गेल्या दोन महिन्यांपासून आवश्यक वस्तूंची खरेदी रखडल्याने सोमवारी बाजारात चैतन्य पाहायला मिळाले.
शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड, रविवार करंजा, महात्मा गांधी रोड, शिवाजी रोड तसेच शालिमार या ठिकाणी ग्राहकांबरोबरच वाहनांची मोठी गर्दी झाली होती. द्वारका चौकातही दिवसभरात अनेकदा वाहतूक कोंडीचा प्रसंग उद्भवला. मेनरोडवर सकाळपासून असलेली गर्दी दुकानांची वेळ संपेपर्यंत कायम होती. अनेक ठिकाणी दुकानदारांनी शटर बंद करून दुकानात आलेल्या ग्राहकांना सेवा दिली.
--इन्फो--
शिंगाडा तलाव येथे गर्दी
शिंगाडा तलाव येथे चारचाकी वाहनांचे कारडेकोर मार्केट असून सोमवारी सकाळपासून या दुकानांसमोर कामकाजाला वेग आला होता. नवी गाडी सजविणे तसेच इतर ॲक्सेसरीज इन्स्टॉल करण्याचे काम या दुकानांसमोर वेगाने सुरू असल्याचे दिसले. वाहनांची या ठिकाणी गर्दी झाल्याने अनेकदा वाहतूक कोंडीचाही प्रश्न निर्माण झाला होता.
--इन्फो--
तिबेटियन मार्केट
जुने पोलीस आयुक्तालयासमोर असलेल्या तिबेटियन मार्केटमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली होती. पावसाळा असल्याने रेनकोट खरेदीला ग्राहकांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले. याबराेबरच या ठिकाणी तरुणाईसाठी जीन्स, टी शर्टस्, शर्टस् तसेच बुटाची शेारूम्स् असल्याने येथेही तरुणांची खरेदीसाठी गर्दी होती.
--इन्फो--
मोबाईल शॉपी
महात्मा गांधी रोडवरील मोबाईल शॉपीच्या दुकानांमध्ये सर्वाधिक गर्दी झाल्याने ग्राहकांना वेटिंग देखील करण्याची वेळ आली. प्रधान पार्कमधील मोबाईल ॲक्सेसरीज मार्केटमध्ये मोठी गर्दी झाल्याने वाहतूक पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. शहरातील मोबाईल शॉपी ही सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने मोबाईल दुरुस्ती तसेच ॲक्सेसरीजसाठी ग्राहकांनी गर्दी गेली होती.
--इन्फो--
भांडी बाजार
भांडी बाजारात देखील गर्दी झाली होती. सध्या लग्नसराई असल्यामुळे तसेच दैनंदिन वापराचे साहित्य खरेदी करण्यासाठी देखील ग्राहकांचा कल दिसून आला. सलग दोन महिने दुकाने बंद असल्याने अनेकांची खरेदी अडली होती. दुकाने सुरू होताच भांडी बाजारात गर्दी झाली. लग्नाचे आहेर तसेच पूजेसाठी लागणाऱ्या भांड्यांची खरेदी झाल्याचे दुकानदारांनी सांगितले.