नाशिक : सात तहसीलदारांचे निलंबन विनाशर्त मागे न घेतल्यास गुरुवार (दि. २८) पासून बेमुदत महसूल खात्याचे कामकाज बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने बुधवारी मध्यरात्रीच आपला निर्णय मागे घेतला. या प्रकरणी निलंबित तहसीलदारांनी मॅटमध्ये धाव घेतल्याने प्रकरण निर्णयाच्या टप्प्यावर असताना कामकाज बंद करणे उचित होणार नाही म्हणून हा निर्णय मागे घेतल्याचे कारण पुढे केले असून, मॅटच्या निर्णयानंतर काय पावले उचलायची त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले आहे. राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने २१ मेपासून संपूर्ण राज्यातील पुरवठा खात्याच्या कामावर टाकलेला बहिष्कार अद्यापही कायम असून, तो यापुढेही कायम राहील, असे संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी जाहीर केले आहे. पुरवठा खात्याच्या कामकाजावर बहिष्कार टाकूनही सरकारने दखल न घेतल्यास २८ पासून महसूल विभागाच्या कामही बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला होता.तथापि, हा निर्णय मागे घेण्यात येत असल्याचे संघटनेने बुधवारी मध्यरात्री लघुसंदेशाद्वारे सर्वत्र कळविला. त्यात म्हटले आहे की, तहसीलदारांनी निलंबनाच्या विरोधात मॅटमध्ये धाव घेतल्यामुळे हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट झाले असून, शासनानेही याबाबत चौकशी समिती नेमलेली आहे.या दोन्ही बाबींचा विचार करता निर्णयाच्या टप्प्यावर प्रकरण असल्याने त्याच विषयावर संपूर्ण कामकाज बंद करणे उचित होणार नाही त्यामुळे कामकाज बंद करण्याचे आंदोलन स्थगित करीत असून, संघटनेच्या राज्य व विभागीय कार्यकारिणीची बैठक तत्काळ घेऊन पुढची दिशा ठरविली जाईल व आवश्यकता पडल्यास काम बंद आंदोलनाची पुढची तारीख निश्चित केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. संघटनेच्या या आवाहनाची दखल घेत गुरुवारी महसूल विभागाचे काम पूर्ववत सुरू होते. (प्रतिनिधी)
लवकरच पुढील निर्णय : महसूलच्या कामावरील बहिष्कार मागे
By admin | Published: May 28, 2015 11:22 PM