नाशिक : कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या बारा दिवसांच्या लॉकडाऊननंतर सोमवारी निर्बंध शिथिल होताच नागरिक विनाकारण घराबाहेर पडल्याने शहरातील रस्त्यांवर गर्दी झाल्याचे दिसून आले. लॉकडाऊनमुळे ओस पडलेले मुख्य चौक आणि बाजारपेठेत नागरिक भटकत असल्याने नागरिकांची गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारी ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अवघ्या चार तासांसाठीच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असतानाही नागरिकांनी या चार तासातच संपूर्ण शहरात गर्दी गेल्याचे दिसून आले. सोमवारी निर्बंध शिथिल होताच नाशिककर पुन्हा रस्त्यावर आल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. किराणा आणि भाजीपाला दुकानेच फक्त सुरू असतानाही नागरिकांनी अशा दुकानांसमोर गर्दी केल्याचे दिसून आले. अनेकजण तर दुचाकी, चारचाकीवर उगाचच शहरात भटकंती करीत असल्याचेही समोर आले.
रविवार कारंजा, एम.जी. रोड, शरणपूररोड, गंगापूरोड त्याचपप्रमाणे, पंचवटी, नाशिकरोड, सिडको, सातपूरला भाजीबाजारांमध्येदेखील गर्दी झाली. रस्त्यावर कुठेही बॅरिकेड्स नसल्याने वाहनांचीही वर्दळ वाढली. पंचवटीतील मार्केट कमिटीसमोर तर समांतर बाजार भरल्याचे चित्र दिसत होते तर नाशिकरोड येथील उड्डाणपुलाखालील बाजारातही मोठी गर्दी झाली होती. रविवार कारंजा येथील किराणा दुकानांमध्ये खरेदीसाठी रांगा लागल्याचे पहायला मिळाले.
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील सर्वात हॉटस्पॉट ठरलेल्या दहा जिल्ह्यांमध्ये नाशिकचा समावेश झाला होता. असे असतानाही जिल्ह्यातील अर्थचक्र सुरू राहावे म्हणून नागरिकांना संयम राखण्याबरोबरच नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात होते. मात्र शिथिलतेचा गैरफायदा घेत नागरिक बाजारांमध्ये गर्दी करीत असल्यामुळे अशा नागरिकांना आवरण्यासाठी पोलिसांनाही उपाययोजना कराव्या लागल्या. मात्र त्याचाही फारसा परिणाम न झाल्याने रुग्णसंख्येत भर पडतच गेली आणि अखेर जिल्ह्यात बारा दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला.
त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. या कालावधीत रुग्णसंख्या कमी झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली.