नाशिक: नवरात्रोत्सव अखेरच्या टप्प्यात आला असताना नाशिक शहरात आडगाव शिवारात एका मंडळाकडून सुरू असलेल्या दांडियाच्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली. यामुळे नवरात्रोत्सवाला गालबोट लागले. दांडिया रंगात रंगलेला असताना ज्या संगीताच्या तालावर तरुणाई दांडियाचा आनंद लुटत होती, ते संगीतव्यवस्था हाताळणाऱ्या ऑपरेटरला वीजप्रवाहाचा जोरदार धक्का बसला. यामुळे त्याचा मृत्यू झाला. पप्पू अरुण बेंडकुळे (३०), असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
आडगाव शिवारातील मेडिकल फाटा परिसरात मंगळवारी (दि.४) रात्री अखेरच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत दांडियाची धूम सुरू होती. येथील जय जनार्दन फाउंडेशनतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ध्वनिवर्धक यंत्रणाही बसविण्यात आली होती. रात्री अकरा वाजेच्या सुमारास दांडिया आटोपल्यानंतर साउंड सिस्टम चालक पप्पू हा साउंड सिस्टम असलेल्या चारचाकी वाहनात
लोखंडी शिडीच्या साहाय्याने चढत असताना शिडीत विजेचा प्रवाह उतरला व त्याला जोरदार झटका बसल्याने तो शिडीवरून खाली कोसळला. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्वरित पप्पूला उचलून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त हाेत आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद केली जात होती.