नाशिक : पुणे येथील समाजकल्याण आयुक्तालयावर राज्यभरातील मूकबधिर बांधवांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीमार घटनेचे शहरात पडसाद उमटले असून, अपंग क्षेत्रातील जाणकारांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे. मूकबधिरांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार असून, अपंगांविषयी कोणतीही आस्था सरकारला नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी नोंदविली. हा मोर्चा अर्थातच शांततेच्या मार्गाने होता. कोणतीही घोषणाबाजी नसताना केवळ मोर्चेकऱ्यांची संख्या वाढत चालल्यानंतर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना पांगविण्यासाठी केलेला लाठीमार निंदनीय असल्याचे मत अपंग क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मांडले.पुणे येथील या घटनेमुळे अपंगांना समाजात सन्मानाने जगू द्यायचेच नाही का? असा प्रश्न पडतो. मूकबधिर तरुण घटनेने दिलेला अधिकार आणि कायद्यानुसार मिळालेला हक्क मागत असताना त्यांच्यावर लाठीचार्ज करणे हे अमानवीय आहे. खरेतर अपंगांप्रती असंवेदनशीलता सरकारने नेहमीच दाखविली आहे. कोणत्याही घटकातील अपंगांचे प्रश्न सुटलेले नाहीत. घोषणा होतात मात्र अंमलबजावणी होत नाही. अपंगांची अवहेलना सुरूच असून, सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे पुन्हा समोर आले. सरकारच अपंगांप्रती असंवेदनशील असेल तर दाद मागणार कुणाकडे? ही निषेधार्ह घटना असून, संबंधितांवर कारवाई व्हावी. - मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, अपंग क्षेत्रातील कार्येकर्तेमूकबधिर मुळातच शांतप्रिय असतात. आवाज आणि शब्दाने साथ सोडलेल्या घटक गोंधळ तरी काय घालणार. तरीही पोलिसांनी लाठीमार करणे अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे. या मूकबधिरांनी सकाळपासून मोर्चा काढला होता. कुठेही त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य केलेले नसताना त्यांच्यावर लाठीमार करणे निषेधार्य असून, या घटनेनंतर आगामी निवडणुकीत एकही मूकबधिर कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही, असे ठरविण्यात आले आहे.- सचिन पाटील, अध्यक्ष, मूकबधिर संघटना, नाशिकअपंगांना त्यांचा हक्क मागण्याचा अधिकार आहे. आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर आलेल्या मूकबधिरांना सरकारकडून याप्रकारे उत्तर मिळेल असे अपेक्षित नव्हते. मूकबधिरांकडून कोणताही उपद्रव नसताना केवळ त्यांची भाषा न समजल्याने लाठीमार करणे चुकीचे आहे. अशावेळी दुभाषी वापरून मूकबधिरांचे म्हणणे ऐकून घेणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांना या अपंग युवकांचे म्हणणे ऐकता आले नाही. या घटनेमुळे समाजातील लोक अपंग घटकाकडे कोणत्या भावनेतून बघतो याचे हे ज्वलंत उदाहरण म्हणता येईल.- ज्योती आव्हाड, निरंजन आव्हाड फाउंडेशन फॉर दे डिसेबल
मुकबधिरांचा ‘आवाज’ दाबण्याचा प्रकार निंदनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:24 PM