लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ध्वनिक्षेपक बसविण्याबाबत शासन व पोलिसांकडून केल्या जात असलेल्या दिशाभुलीच्या निषेधार्थ साउंड सिस्टीम ओनर्स वेलफेअर असोसिएशन व प्रोफेशनल आॅडिओ अॅण्ड लायटनिंग असोसिएशनने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून निवेदन दिले.शहरातील बी. डी. भालेकर मैदानावरून काढण्यात आलेल्या हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, नॉइज पोल्युशन अॅक्ट व सर्वोच्च न्यायालयाने कुठेही ध्वनिक्षेपक यंत्रणा व्यवसाय करण्यास बंदी केलेली नाही, परंतु न्यायालयाच्या निर्देशांचा विपर्यास करून जनतेची व व्यावसायिकांची महाराष्टÑ पोलिसांकडून दिशाभूल केली जात आहे. साउंडचा व्यवसाय बेकायदेशीर असल्याचे तोंडी निर्देश पोलिसांकडून दिले जात असल्यामुळे राज्यातील हजारो साउंड व्यावसायिक व त्यांच्याकडील कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. कोणतेही सार्वजनिक मंडळे या व्यावसायिकांना काम देत नाहीत, त्यामुळे लाखो रुपयांचे कर्ज घेऊन खरेदी करण्यात आलेली सामुग्री पडून आहे. न्यायालयाच्या चौकटीत व्यवसाय करण्यास साउंड सिस्टीमचालक तयार असतानाही डेसीबल रिडिंग चुकीच्या पद्धतीने घेऊन पोलीस व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करीत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.कायद्याच्या चौकटीत डेसिबलच्या मर्यादेत ध्वनिक्षेपक लावण्यास किंवा वाजविण्यास आम्ही बांधील असून, या व्यवसायावर बंदी नाही असे सरकारने जाहीर करावे, चुकीच्या पद्धतीने साउंड मोजल्यामुळे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे, पोलीस खाते, प्रदूषण महामंडळ यांना साउंड मोजण्याचे, डेसिबल हाताळण्याचे योग्य ते प्रशिक्षण देण्यात यावे, उत्सवाच्या काळात ध्वनी मर्यादेबाबत शिथिलता आणण्यासाठी अध्यादेश काढण्यात यावा आदी मागण्याही मोर्चेकयांनी केल्या आहेत.
साउंड सिस्टीम व्यावसायिकांचा मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 3:43 PM