सिडको : देशातील लेखा विभागाचे अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वांत मोठे कार्यालय असलेल्या सिडको लेखानगर येथील भारत सरकारच्या वेतन लेखा कार्यालयात दक्षिण कमान प्रधान नियंत्रक बेन्झामिना यांनी भेट देऊन कार्यालयातील कामकाजाची पाहणी करून माहिती जाणून घेतली.लेखानगर येथील कार्यालयात सोमवारी बेन्झामिन यांनी भेट देत कार्यालयातील कामकाजाची संपूर्ण माहिती घेतली. यावेळी लेखानगर विभागाचे अप्पर रक्षा लेखा नियंत्रक धनंजय सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, सैन्य विभागात काम करणाऱ्या सैनिकांचे आर्थिक उलाढाल करणारे हे भारतातील सर्वांत महत्त्वाचे कार्यालय असून, याच कार्यालयातून देशातील आर्मीच्या आर्टिलरी (तोफखाना) विभागात कामकाज करणाºया अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी दरमहा सुमारे बारा ते चौदा कोटींची उलाढाल होत असते. लेखानगर येथे असलेल्या कार्यालयाप्रमाणे भारतभर सुमारे १५० ते १७० कार्यालय असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यालयात सुमारे एक लाख साठ हजार कर्मचारी व अधिकाºयांना वेतन देण्यात येते. पूर्वी सैन्यातून निवृत्त झाल्यावर पाच ते सहा महिन्यांनी त्यांंना पेंशन लागू होत होती. परंतु आता यात मोठ्या प्रमाणात बदल झाला असून, अधिकारी व अथवा कर्मचारी हा सैन्यातून सेवानिवृत्त झाल्याच्या दिवशीच त्यांच्या खात्यात त्यांना मिळणारी रक्कम जमा होत असल्याचेही धनंजय सिंह यांनी सांगितले. सेवानिवृत्त होणाºया अधिकारी किंवा कर्मचाºयाच्या कागदपत्रांबाबत सुमारे सहा महिने अगोदरपासून कार्यवही सुरू होत असते. सध्या संगणकीयदृष्ट्या हे काम सोपे झाले असले तरी सिडकोतील लेखानगर कार्यालयातील कर्मचारी यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. बेन्झामिन हे अधिकारी येत्या २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत असून, त्यांनी त्यांच्या कार्यकाळ अनेक चांगले निर्णय व बदल केले असून, यात सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे अधिकारी व कर्मचारी हे सेवानिवृत्त होत असलेल्या दिवशीच त्यांच्या खात्यात त्यांची रक्कम जमा होत असल्याचा निर्णय असल्याचे सिंह यांनी सांगितले. यावेळी सहायक लेखा अधिकारी आर. ए. बिडवई, सुभाष कुमार, किशोर कोठेकर, जितेंद्र सिंह, लता आदी उपस्थित होते.लेखानगर कार्यालय हे लेखा विभागाचे महत्त्वाचे कार्यालय असून, देशातील सर्व आर्मी, तोफखाना विभागाप्रमाणेच नाशिकच्या लेखा विभागाचे कामकाज हे अत्यंत पारदर्शक आहे. शहीद झालेल्यांना किंवा जखमींना मदत करावयाची असल्यास मदत घेणारी संस्था ही सरकारशी संबंधित आहे का याबाबत योग्य ती खातरजमा करूनच मदत द्यावी, असे आवाहन बेन्झामिन यांनी केले.
दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 1:14 AM