नाशिक : मनुष्य पैसा व संपत्ती असतानाही समाधानी होऊ शकत नाही, कारण त्याचे मन स्थिर नसते. मन हे चंचल आणि चपळ असल्याने मनुष्य नेहमी असमाधानी असतोे. अशा चंचल व चपळ मनावर प्रभुत्व मिळविल्यास समाधान प्राप्ती शक्य असून, त्यासाठी संंतांनी दाखविलेला अध्यात्माच्या मार्गाचा अवलंब करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.परशुराम सायखेडकर नाट्यगृहात बस्तीरामजी सारडा स्मृती व्याख्यानमालेत सोमवारी (दि.२८) चैतन्य महाराज देगलूरकर यांनी समारोपाचे तृतीय पुष्प गुंफताना ‘संत साहित्य ही आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, चंचल मन हे हातात घेतलेले काम सोडून दुसरे काम हाती घेते तर चपळ मन हे हातातील काम तत्काळ पूर्ण करून दुसरे काम हाती घेणारे असते, असेही देगलूरकर महाराज यांनी सांगितले.संत ज्ञानेश्वरांनी मन चपळ असल्याचे वर्णन केले आहे. मात्र तुकाराम महाराज मन हे चपळ आणि चंचल असे दोन्ही असल्याचे सांगतात. त्यामुळे अशा चपळ व चंचल मनाला स्थिर करण्यासाठी त्यावर ताबा मिळविणे आवश्यक असून, मनावर प्रभुत्व मिळविण्याचा मार्ग संत साहित्याने दाखविला आहे. त्यामुळेच संत साहित्य ही आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री असल्याचे चैतन्य महाराज देगलूरकर यांनी यावेळी नमूद केले.
मनावर प्रभुत्व मिळविल्यास समाधान प्राप्ती शक्य : देगलूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:53 AM