लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गंगापूर धरणाने गाठलेला तळ पाहता, संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून महापालिकेने रविवारपासून एक वेळ पाणीपुरवठा करण्याच्या घेतलेल्या निर्णयाने पहिल्याच दिवशी ५० एमएलडी पाण्याची बचत झाली आहे. तथापि, रविवारपासून सुरू झालेल्या पावसाने तिसऱ्या दिवशीही हजेरी कायम ठेवल्यामुळे धरणाच्या पाण्यात किंचित वाढ झाल्याने पाणीकपातीच्या निर्णयावर फेरविचार होण्याची शक्यता आहे.
गंगापूर धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करून ३१ जुलै अखेरपर्यंत पाणी पुरविण्यासाठी महापालिकेने रविवारपासून शहरात एक वेळ पाणीकपात सुरू केली असून, पाणीकपातीतून पहिल्या दिवशी सुमारे ५० एमएलडी पाण्याची बचत झाली. पाणीकपात करूनही नागरिकांना पुरेसे पाणी मिळाल्याचा दावा करून पाणीपुरवठा विभागाने यानंतर पुढच्या काही दिवसांत टप्प्या टप्प्यानुसार ही कपात ६० एमएलडीपर्यंत नेण्यात येणार असल्याचे सांगितले.यापूर्वी संपूर्ण शहरात अगोदर दररोज ४६० एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. त्यात काही ठिकाणी दोन वेळा तर काही ठिकाणी एकवेळ परंतु दोन ते तीन तासांपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यात आता कपात करण्यात आली आहे. शहराला पुरवल्या जाणाºया पाण्यातून पहिल्याच दिवशी ५० एमएलडी पाण्याची कपात करण्यात आली आहे. पाणीकपातीच्या माध्यमातून वाचवलेल्या पाण्यातून सध्याच्या पाणीपुरवठ्याप्रमाणेच शहराला ३१ जुलैपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. रविवारपासून सलग आजही शहरात पाऊस सुरू असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पाणीकपात कायम ठेवण्यात आलेली आहे. मात्र आठ दिवसांत धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यास गुरुवारी संपूर्ण दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय बदलला जाऊ शकतो, अशी शक्यता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.