सारांशलगतच्या राज्यातील निवडणूक निकालांनी शेतकरीवर्गाचे महत्त्व आणि मतप्रक्रियेतले त्यांचे निर्णायकत्व अधोरेखित करून दिल्याने देवेंद्र फडणवीस सरकार तर सजग होऊन गेले आहेच; शिवाय राजकीय प्रभावाच्या स्पर्धेत आपली जागा निश्चित करू पाहणाºया पक्षांनाही स्वत:ला विस्तारण्यासाठीचे संधिक्षेत्र लक्षात येऊन गेले आहे. आजवर प्रामुख्याने शहरी भागावरच लक्ष केंद्रित केलेल्या राज ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यात धावते नव्हे तर, सविस्तरपणे वेळ काढून केलेले दौरे व शेतक-यांच्या कांदा प्रश्नाची घेतलेली दखल, याकडेही त्याचसंदर्भाने पाहता यावे.मध्य प्रदेश, छत्तीसगढ व राजस्थानच्या विधानसभा निवडणूक निकालात शेतकरीवर्गाची नाराजी निर्णायक ठरली, त्यामुळे तेथे सत्तापालट होताच नवीन शासनाने तातडीने शेतकरी कर्जमाफीचे निर्णय घेतले. तोच धागा धरीत केंद्राने अद्याप आपला हात पुढे केलेला नसला तरी राज्य शासनाने कांद्याचे दर कोसळल्याने नुकसान सोसणाºया कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान घोषित केले आहे. विरोधी पक्षांनी हे अनुदान तुटपुंजे व शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळणारे असल्याचे म्हणत आंदोलने सुरू ठेवली आहेत. याच मालिकेत, म्हणजे ग्रामीण भागातील ग्रामस्थांशी नाळ जोडून नवनिर्माण घडविण्याच्या अपेक्षेने आता राज ठाकरे यांनीही पाऊल उचलले आहे. त्याची सुरुवात त्यांनी नाशिक जिल्ह्यापासून केली असून, ठिकठिकाणच्या त्यांच्या भेटींना शेतकरी व ग्रामीण तरुणांचा जो प्रतिसाद मिळतो आहे, तो त्यांच्या पक्षात म्हणजे ‘मनसे’त उत्साह व ऊर्जा पेरणारा तर नक्कीच आहे; परंतु ग्रामीण भागातील राजकारणाची मक्तेदारी मिरवणाºया काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांना स्तिमित करणाराही आहे.राज ठाकरे यांच्या ‘मनसे’चे राजकारण हे आजवर तसे शहर केंद्रीच राहिले आहे. नाही म्हणायला त्यांनी ग्रामीण भागात पक्ष पदाधिकारी नेमलेत; पण प्रस्तापितांपुढे त्यांचा निभाव लागू शकला नाही. यातली सर्वात मोठी अडचण अशी आहे की, पक्षापेक्षा स्वत:चे स्वतंत्र वलय असलेले नेते ‘मनसे’कडे नाहीत. त्यामुळे राज ठाकरे आलेत की त्यांच्या ठाकरी शैलीला दाद देणा-यांची तुडुंब गर्दी होते. स्थानिक नेते-पदाधिकारी आगे-मागे फिरतात व राज मुंबईत परतले की सारी सामसूम होते. राजकारणात अशी टप्प्या-टप्प्याची सक्रियता उपयोगी पडत नसते. कायम कोणत्या न कोणत्या निमित्ताने लोकांसमोर राहावे लागते. ‘मनसे’ला तेच जमले नाही. या पक्षाच्या स्थापनेनंतर राज यांना सर्वाधिक समर्थन लाभले होते ते नाशकात. गेल्यावेळी महापालिकेची सत्ताही त्यांच्याकडे होती. परंतु स्थानिक पातळीवर पक्षाचा किल्ला लढविणारे नेतृत्वच त्यांच्याकडे नाही. बरे, राज एकटे कितीदा नाशिकच्या चकरा मारणार? त्यांनी मांडलेला विचार किंवा दिलेले सूत्र पुढे नेऊन पक्षाची सक्रियता कायम ठेवण्याचे काम स्थानिक पक्ष पदाधिकाºयांचे असते. गेल्या काळात तेच घडले नाही, परिणामी महापालिकेतील सत्ता तर गेलीच, पक्ष संघटनाही खिळखिळी झाली. परंतु राज ठाकरे यांच्या अलीकडील दौºयांमुळे व नवीन पदाधिकाºयांमुळे आता वातावरणात बदल झालेला दिसून येतो आहे.महत्त्वाचे म्हणजे, शहरा खेरीज ग्रामीण भागाकडे नवा वर्ग ‘मनसे’शी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठीच्या पहिल्या प्रयत्नांतच कांद्याचा विषय हाती घेतल्याने प्रतिसादही मोठा लाभला. राज यांच्या वक्तृत्वाचा ‘टीआरपी’ टिकून असल्याने ग्रामीण जनतेत त्यांच्याबद्दलची उत्सुकता आहे. तरुणवर्गही मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद देताना या दौºयात दिसून आला. विशेष म्हणजे, ‘मनसे’चा पक्षीय दौरा असताना ठिकठिकाणी अन्य पक्षीय नेते, पदाधिकारी व दिंडोरीत राष्ट्रवादीचे आमदारही त्यांना भेटलेले व आपल्या परिसरातील गाºहाणे त्यांच्यासमोर मांडताना दिसले. खरे तर त्यांनी असे करणे म्हणजे, आपापल्या पक्षावर व नेत्यांवरही एकप्रकारे अविश्वासच व्यक्त करण्यासारखे आहे. पण, त्यासंबंधीचे भान न बाळगता या भेटीगाठी झाल्याने त्यातून वेगळाच संकेत प्रसृत होण्यास मदत झाली. इतरांचे काहीही असो अगर होवो, यातून राज ठाकरे यांची मात्र जबाबदारी वाढून गेली आहे. ग्रामीण जनता व संबंधित सर्व मंडळी त्यांच्याकडे आशेने पाहते आहे, हे तर यातून स्पष्ट व्हावेच; परंतु ‘मनसे’कडे पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकण्याची संधीही यातून साधता येणारी आहे. अर्थात, यासाठी संपर्क व सक्रियतेतले सातत्य राखले जाणे गरजेचे आहे. केवळ ‘खळ्ळखट्याक’च्या भाषेने हा प्रतिसाद टिकवून ठेवता येणार नाही तर सुस्पष्ट भूमिका-धोरण व पक्ष कार्यक्रम घेऊन यापुढील वाटचाल करावी लागेल. त्याकरिता ‘मनसे’च्या तंबूतले अन्य खांबही बळकट करावे लागतील. ते अवघड असल्याने घडून येईल का तसे, हेच आता पाहायचे !
ग्रामीण भागात ‘मनसे’च्या पर्यायाची पेरणी!
By किरण अग्रवाल | Published: December 23, 2018 1:33 AM
‘मनसे’च्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांची पाठराखण करणारा नाशिकचा राजगड मध्यंतरी भाजपाच्या हाती लागला असला तरी, तो आता पुन्हा सावरण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ते करताना ग्रामीण भागातील शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही लक्ष पुरवणा-या व या नव्या वर्गात आपल्या पक्षाची पर्याय म्हणून पेरणी करणा-या राज यांना लाभणारा प्रतिसाद बरेच काही सांगून जाणारा आहे.
ठळक मुद्देराज यांना लाभणारा प्रतिसाद बरेच काही सांगून जाणारा शेतकरीवर्गाची नाराजी निर्णायक ठरलीपक्षापेक्षा स्वत:चे स्वतंत्र वलय असलेले नेते ‘मनसे’कडे नाहीत