लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : मृग संपून आर्द्रा नक्षत्रात पावसाने तुरळक हजेरी लावली. सध्या सुरू असलेल्या पुनर्वसू नक्षत्रात पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असून, शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे लागले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती असल्यामुळे शेतरक ऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. प्रारंभी थोडासा पाऊस पडला यामुळे बियांनी रोपे धरली. परंतु गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली तसेच रोज कडक ऊन पडत असल्यामुळे रोपे करपू लागली आहेत. रोहिण्यानंतर मृगाच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. गेल्या तीन आठवड्यांपासून येवला तालुक्यात पावसाने पूर्णत: उघडीप दिल्याने शेतात उगवलेली पिके जळू लागली आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मृग नक्षत्रातील पावसावर तालुक्यातील जवळपास संपूर्ण शेतकऱ्यांनी शेते तयार केली व ज्यांची शेते तयार होती त्यांनी कापूस, सोयाबीन, मका आदी पिकांची लागवड केली. मृगामध्ये तालुक्यात काही ठिकाणी वरुणराजाने दमदार सुरु वात केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांनी अक्षरश: कर्ज काढून बी-बियाणे आणि खतांची खरेदी केली; मात्र आता पावसानेच दडी मारल्याने शेतकरी चिंतित आहेत. गेल्या चार दिवसांपासून आभाळात केवळ ढगांची गर्दी, ऊन सावलीचा खेळ होत असला तरी पाऊस बेपत्ता आहे. आगामी चार दिवसांत पाऊस पडला नाही तर शेतातील पिके करपून दुबार पेरणीचे संकट ओढवणार असल्याचे चित्र तालुक्यात आहे. मागील आठवड्यात सूर्याचे दर्शन झाले नाही. सर्वत्र केवळ ढगाळ वातावरण होते. आता ढगही गायब झाले आहेत. सुसाट वारा सुटल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. शिवाय उतरून पडलेले मका, बाजरी, मूग पिके आता पिवळी पडू लागली आहेत. मका पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. पीकविमा घेण्याची तयारी अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. गेल्या तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्याला यंदा ऐन हंगामात पुन्हा वरुणराजाने वक्र दृष्टी केल्याने चिंता वाढली आहे; मात्र मृग आणि आर्द्रा नक्षत्रातील जेमतेम पावसावर खरीप पेरण्यांची कामे आटोपली होती. आता पाण्याअभावी पिके संकटात सापडली आहेत. पश्चिम भागात अद्यापही दमदार पर्जन्यवृष्टी झालेली नसल्याने विहिरींना पाणी उतरणे तर दूरच जमिनीची तहानदेखील भागलेली नाही. यंदा चांगला पाऊस होईल या अंदाजावर पुन्हा कर्ज काढून उभारी धरलेल्या शेतकऱ्याचे कंबरडे मोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चारा छावण्या तर येवला तालुक्याला मृगजळच ठरल्या आहेत. भीजपावसाने निर्माण झालेल्या हिरवळीवर सध्या जनावरे पोसली जात आहेत.
पावसाअभावी दुबार पेरणी
By admin | Published: July 10, 2017 12:04 AM