लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जूनचा तिसरा आठवडा संपत चालला असताना अद्यापही पावसाचे आगमन न झाल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या असून, त्याचा परिणाम सोयाबीन लागवड व भाताच्या रोपांवरही झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी होणारी सोयाबीनची लागवड लांबणीवर पडल्यास त्यावर किडीची लागण व उत्पादनात घट होण्याची शक्यता अधिक असून, यंदा भाताची रोपेही अद्याप तयार झाली नसल्याने सहा तालुक्यातील शेतकरी हातावर हात ठेवून बसून आहेत.
यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असून, एरव्ही मे महिन्यात येणाऱ्या मान्सूनपूर्व पावसानेही यंदा दडी मारल्यामुळे या पावसाच्या भरवशावर जमिनीची धूप कमी होण्याची वाट पाहणाºया शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. जूनच्या दुसºया आठवड्यापर्यंत पाऊस पडल्यास शेतकºयांकडून पेरणी सुरू केली जाते, तर याच पावसाच्या भरवशावर भातासाठी नर्सरीत रोपे टाकली जातात. विशेष म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनची अगोदर पेरणी करावी लागते. कारण जूनअखेर व जुलैच्या प्रारंभी धो धो कोसळणार पाऊस हा सोयाबीनच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो. परंतु त्यासाठी सोयाबीनची अगोदर पेरणी होणे गरजेचे आहे. दरवर्षी ७ जूननंतर ही पेरणी झालेली असते. परंतु यंदा अजूनही पेरणी न झाल्यामुळे सोयाबीनच्या पिकाला मार बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, उशिरा पेरणी झाल्यास सोयाबीनला कीड लागण्याची व पर्यायाने उत्पादनात घट होण्याची भीती आहे. असाच प्रकार भात लागवडीबाबत आहे. जूनच्या तिस-या आठवड्यापर्यंत भात पिकविणा-या तालुक्यांमध्ये सरासरी दोन टक्केच पाऊस झाला आहे. हा पाऊसदेखील काही विशिष्ट ठिकाणीच झाला असून, त्यामुळे भाताची रोपे करण्यासाठी नर्सरी सुरू होेऊ शकलेल्या नाहीत. जूनमध्ये नर्सरीत रोपे तयार होण्यास टाकल्यास साधारणत: दीड महिन्यात रोप लागवडीयोग्य होते व त्यानंतर जुलैअखेर व आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात भाताची लावणी सुरू केली जाते. जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण व सटाणा तालुक्यातील काही भागात भाताचे पीक घेतले जाते. आता नर्सरीच तयार झाली नसल्याने भाताची लावणीदेखील लांबणीवर पडेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. सोयाबीन प्रमाणेच यंदा तुरीच्या उत्पादनातही घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तुरीचे पीक सहा महिन्यांनी येते, त्यासाठी त्याची पेरणी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणे गरजेचे असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधीक्षक रमेश शिंदे यांनी दिली.