दरम्यान, गतवर्षीचा अनुभव लक्षात घेउन यावर्षी सोयाबीन बियाणे विकताना विक्रेत्यांनी सावध पवित्रा घेत उगवण क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून हमीपत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीनचे बोगस बियाणे निघाल्यामुळे मागीलवर्षी अनेक शेतकऱ्यांची पेरणी वाया गेली, काहींना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी करूनही काहींच्या उत्पादनावरही परिणाम झाल्याने यावर्षी सोयाबीन बियाणांच्या उपलब्धतेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १९ हजार २१० क्विंटल सोयाबीन बियाणांची मागणी करण्यात आली होती. मेअखेरपर्यंत जिल्ह्यात १३ हजार ९३८ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. यात खासगी आणि शासकीय दोन्ही बियाणांचा समावेश आहे. यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने आणि गेल्या काही महिन्यात सोयाबीनला मिळणारा भाव पाहता, यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता असल्याने बियाणांचा तुटवडा निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाणांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
चौकट-
प्रमुख कंपन्यांच्या बियाणांच्या किमती (३० कि. गोणी)
कंपनी २०२० २०२१
इगल सीड्स २४५० ३१२५
ग्रीन गोल्ड २८०० ३२४०
महाबीज २२५० २२५०
कृषी धन २९०० ३३००
अंकुर २८५० ३३००
कोट-
जिल्ह्यात सध्या सर्वत्र बियाणे उपलब्ध आहे. पाऊस पडल्यानंतर मात्र खरेदी सुरू झाल्यानंतर टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. उगवण क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून हमीपत्र भरून घेत असलो तरी, ते आमच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने आहे. त्यातून शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचा प्रश्न नाही. अनेक शेतकरी हमीपत्र भरून देत नाहीत, पण त्यांना बियाणे दिले जाते.
- अरुण मुळाणे, उपाध्यक्ष, नाडा
चौकट-
पुरेसा पाऊस झाल्यावरच करा पेरणी
गतवर्षी सोयाबीन बियाणे माेठ्या प्रमाणात बोगस निघाल्याने अनेक शेतकऱ्यांचा खर्च वाया गेला होता. यावर्षी बियाणे पेरण्यापूर्वी शेतकऱ्यांनी त्याची उगवण क्षमता तपासावी. यासाठी कृषी विभागामार्फत प्रात्याक्षिके घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. पुरेसा पाऊस झाल्यावरच परेणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.