नाशिक : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे ऐन फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन पिकाच्या बियाणांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्या शेतकºयाकडे मागील वर्षीचे सोयाबीन शिल्लक आहे त्यांनी त्याचा बियाणासाठी वापर करावा यासाठी जागृती केली जात आहे. जिल्ह्यात आजमितीला आवश्यक असलेल्या बियाणांपैकी ६८ टक्के बियाणे उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा कृषी विभागाकडून केला जात आहे.जिल्ह्यात सोयाबीनचे ५९ हजार ३४८ हेक्टर इतके क्षेत्र आहे. गतवर्षी प्रत्यक्ष १ लाख २१०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती.गतवर्षी पाऊस चांगला असल्याने सोयाबीनचे उत्पादन भरघोस येईल, असा अंदाज होता. मात्र मक्यापाठोपाठ सोयाबीनवर झालेला लष्करी अळीचा प्रादुर्भाव आणि पीक ऐन फुलोºयात असताना झालेली अतिवृष्टी याचा सोयाबीनच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. अनेक शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले. नैसर्गिक संकटातून ज्यांचे पीक तरले त्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला. काहींना तर एकरी ३ ते ४ क्विंटल इतकेच उत्पादन मिळाले. यामुळे सोयाबीनच्या एकूण उत्पादनावर परिणाम झाला. दरवर्षीच्या एकूण उत्पादनावर पुढील वर्षाच्या हंगामाचे नियोजन अवलंबून असते. मागील वर्षी उत्पादनात झाल्यामुळे यावर्षी सोयाबीनच्या बियाणांचा तुटवडा निर्माण होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.यावर्षी सोयाबीनसाठी ७५ हजार ५०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले असून, त्यासाठी २२ हजार ६५० क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. जिल्ह्यात आजमितीला १५ हजार ३२८ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. म्हणजे एकूण आवश्यक बियाणांच्या ६८ टक्के बियाणे उपलब्ध असल्याचा कृषी विभागाचा दावा आहे.यावर्षी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रस्तावित क्षेत्रासाठीच बियाणे कमी असल्याने वाढीव क्षेत्रासाठी बियाणे कसे उपलब्ध होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.-----------------------------------शेतकºयांमध्ये जागृतीमागील वर्षीचे सोयाबीन शिल्लक आहे अशा शेतकºयांनी त्याचाच बियाणे म्हणून वापर करावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. यासाठी जागृती केली जात आहे. अशा शेतकºयांची यादीही केली जात आहे. सोयाबीनचे बियाणे कमी पडले तर शेतकºयांनी पर्यायी पिकांची लागवड करावी, असे आवाहन केले जात आहे. सोयाबीनला पर्याय म्हणून अनेक शेतकरी मका पिकाची निवड करण्याची शक्यता आहे. पर्यायाने मक्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यात यंदा सोयाबीन बियाणाचा तुटवडा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 9:53 PM