जिल्ह्यात गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उतरलेच नाही तर काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली यामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. याशिवाय परदेशातही सोयाबीन उत्पादनावर मोठ्या प्रमाणात घट झालेली असल्यामुळे सोयाबीनचे दर वाढत आहेत. हंगामाच्या सुरुवातील सोयाबीन तीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते. मात्र अनेक देशांमध्ये सोयाबीनचा तुटवडा निर्माण झाल्याने सोयाबीनला सध्या चांगला भाव मिळत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत दररोज २५० ते ३५० पोते सोयाबीनची आवक होत आहे. साेमवारी या बाजार समितीत सोयाबीनला कमीत कमी ४ हजार तर अधिकाधिक ८००१ रुपया प्रति क्विंटल इतका दर जाहीर झाला. यामुळे सोयाबीन उत्पादकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले आहे.
चौकट-
सध्या लासलगाव येथेच सोयाबीनची चांगली आवक होत आहे. येवला बाजार समितीचे कामकाज मागील तीन दिवसांपासून बंद आहे. येथे साधारणत: ५ ते १० क्विंटलपर्यंत आवक होत असते. मालेगाव बाजार समितीत फारशी आवक नाही तर नांदगाव बाजार समितीतही सोयाबीनची आवक जवळपास बंद झाली आहे.
चौकट-
उन्हाळ कांदा पोहोचला १,२०० पर्यंत
सध्या बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक होत असून उन्हाळ कांद्याला सरासरी १,२०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. लासलगावी सोमवारी जास्तीत जास्त दर १,६५२ रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला होता. उन्हाळ कांद्याला आगामी काही दिवसांत अधिक भाव येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. लाल कांद्यानेही हजार रुपये क्विंटलपर्यंतची मजल मारली आहे. कांदा दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांचा किमान उत्पादन खर्च तरी निघत आहे.