नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राष्ट्रीय व राज्य महमार्गावरील बंद करण्यात आलेल्या मद्यविक्री दुकानांचे पुन्हा सुरू होणे अशक्य दिसू लागताच मद्यविक्रेत्यांकडून नाशिक शहराच्या मध्यवस्तीत जागेचा शोध सुरू झाला असून, न्यायालयामुळे बंद झालेल्या दुकानांच्या पुनरुज्जीवनाला मात्र स्थानिक रहिवाशांचा विरोध कायम असल्याने ही दुकाने सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.राष्ट्रीय व राज्यमहामार्गावर पाचशे मीटर अंतरात असलेल्या मद्यविक्रीचे दुकानांचे परवाने १ एप्रिलपासून नूतनीकरण न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे गावाबाहेरील तसेच गावातून गेलेल्या राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील सर्वच दुकाने बंद झाली आहेत. राष्ट्रीय व राज्यमहामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या व मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या पाहता नजीकच्या काळात सर्वोच्च न्यायालय या निर्णयाचा फेरविचार करून मद्यविक्रीची दुकाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता नसल्याचे ओळखून असलेल्या मद्यविक्रेत्यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहरात, परंतु राष्ट्रीय व राज्य मार्गाच्या पाचशे मीटर दूर अंतरावरील जागांचा शोध घेतला जात असून, काही दुकानदारांना त्यात यश आले आहे, तर काही ठिकाणी जागा उपलब्ध असली तरी, स्थानिक रहिवाशांचा मद्यविक्री दुकानांना विरोध आहे. सर्वोच्च न्यायालय मद्यविक्री बंदीबाबत कठोर झाल्याचे पाहून नागरिकांना बळ लाभले असून, सातपूर येथील मध्यवस्तीतील दुकानाला त्यातूनच विरोध केला जात आहे. मद्यविक्री दुकानांचा होत असलेला विरोध पाहता शहरात त्यांना जागा मिळणे अशक्य मानले जात आहे. (प्रतिनिधी)
मद्यविक्रेत्यांकडून जागेचा शोध
By admin | Published: April 23, 2017 2:08 AM