नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शासनाकडून मिळणाऱ्या शुल्क प्रतिपूर्तीच्या निधीवरून महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षण संस्था महामंडळातील पदाधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. महामंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री विजय नवल पाटील यांनी शाळांच्या आरटीई शुल्कप्रतिपूर्तीचा निधी केंद्राकडून मिळाला असताना राज्य सरकारने दुसरीकडे वळविल्याचा आरोप केला होता. परंतु, पाटील यांच्या या आरोपाचे महामंडळाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी बुधवारी (दि. ८) पत्रकार परिषद घेऊन खंडन केले आहे. त्यामुळे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गट पडल्याचे समोर आले आहे.
नाशिकरोड येथील के. जे. मेहता हायस्कूल येथे मंगळवारी (दि. ७) पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारने आरटीईच्या शुल्क प्रतिपूर्तीचा निधी अन्यत्र वळविल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेला राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाडही उपस्थित असताना विजय नवल पाटील यांनी अशा पद्धतीने राज्य सरकारवर आरोप केल्याने कोंडाजी आव्हाड यांची पक्षांतर्गत कोंडी होऊ लागल्याने अखेर कोंडाजी आव्हाड यांना बुधवारी (दि. ८) समोर येऊन आपण विजय नवल पाटील यांच्या विधानाशी सहमत नसल्याचा खुलासा कारावा लागला. त्यानुसार केंद्राकडून शिक्षणासाठी येणाऱ्या निधीचा महाविकास आघाडी सरकारकडून कधीही दुरुपयोग झालेला नसल्याचे आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे. त्यामुळे खासगी शिक्षण संस्था महामंडळ पदाधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली असून, याचे परिणाम मंडळातील कार्यकारिणी व आगामी काळातील राजकारणावरही उमटण्याचे संकेत दिसून येऊ लागले आहेत.