नाशिक : केरळमध्ये ‘निपाह’ विषाणूंमुळे १३ जणांचे बळी गेल्यानंतर नाशिक महापालिकाही सतर्क झाली असून, जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन तथा कथडा रुग्णालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली आहे. नाशिक शहरात मोठ्या संख्येने केरळी बांधव वास्तव्यास आहेत. प्रामुख्याने, आर्टिलरी सेंटर, नोट प्रेस, गांधीनगर प्रेस या केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या कार्यालयांमध्येही केरळी बांधव सेवेत आहेत. सध्या सुट्यांचा हंगाम असल्याने अनेक केरळी बांधव आपल्या प्रांतात गावी गेले आहेत. सुट्यांचा कालावधी संपत आल्याने परतीचा प्रवासही सुरू झालेला आहे. याशिवाय, नाशिकमधून केरळमध्ये पर्यटनासाठी जाणाºयांची संख्या मोठी असते. केरळमध्ये प्रवास करण्याचे टाळावे आणि सतर्कता बाळगण्याचे आवाहन महाराष्ट्र सरकारने केले असतानाच नाशिक महापालिकेनेही सतर्कता म्हणून जुन्या नाशकातील कथडा रुग्णालयात विशेष कक्ष कार्यान्वित केला आहे. निपाह व्हायरसमुळे ३ ते १४ दिवसांचा ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यास अडचणी, मेंदूला सूज तसेच मांसपेशी दुखणे आदी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे सदर लक्षणे आढळून आल्यास त्यांनी कथडा रुग्णालयात विशेष कक्षात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. राजेंद्र भंडारी यांनी केले आहे. महाराष्ट सरकारकडून अद्याप कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत. परंतु, नाशिक महापालिकेने सतर्कता म्हणून डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात विशेष कक्ष कार्यान्वित केलेला आहे. सदर व्हायरसचा महाराष्टला धोका नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तरीही लक्षणे आढळून आल्यास तत्काळ वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.- डॉ. राजेंद्र भंडारी, वैद्यकीय अधीक्षक, मनपा
कथडा रुग्णालयात विशेष कक्ष कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 1:06 AM