नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, शासनाने शाळांना सुट्या जाहीर केल्या असून, येत्या १५ जूनपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार असल्या तरी, या काळात अभ्यासाची गोडी कायम ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्यात यावे, त्याचबरोबर पालक व मुलांमध्ये सुसंवाद राहण्यासाठी शिक्षण विभागाकडून एक महिन्यासाठी विशेष शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची मासिक बैठक सभापती सुरेखा दराडे यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून घेतली. या बैठकीत चालू वर्षाच्या शैक्षणिक धोरणाबाबत चर्चा करण्यात येऊन शासनाने १५ जूनपर्यंत शाळा बंद ठेवल्या असल्या तरी, त्यानंतर शाळा सुरू न झाल्यास शिक्षण सुरू ठेवण्यासाठी टेलिव्हीजन, रेडिओ व मोबाइलच्या माध्यमातून आॅनलाइन शिक्षण देण्याबाबत शिक्षण विभागाने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दराडे यांनी केल्या.या बैठकीच कळवण तालुक्यातील भेंडी येथील शाळेने अनेक चांगले उपक्रम राबविले असून, जिल्ह्यातील इतर शाळांनी त्याचे अनुकरण करावे, अशी सूचना सदस्य नूतन आहेर यांनी केली, त्यावर कोरोना संपल्यावर सदर शाळेस भेट देण्याचे ठरविण्यात आले. सदस्या मनीषा पवार यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या न वाढल्यास अनेक शाळा बंद होण्याची व त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. या बैठकीस जे. डी. हिरे, आशा जगताप, सुनीता पठाडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.-------पालक -मुले यांच्यात सुसंवाद असावासध्या दूरदर्शन वाहिनीवर सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गासाठी शैक्षणिक उपक्रम राबविले जात असून, सदर उपक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याचे ठरविण्यात आले. त्याचबरोबर पालक व मुले यांच्यात सुसंवाद राहण्यासाठी शिक्षण विभागामार्फत घरीच बसून ३० प्रकारे छोटे घरगुती उपक्रम एक महिन्यासाठी राबविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होण्याच्या दृष्टीने सदरचे उपक्रम फायदेशीर ठरतील, अशी माहिती शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी दिली.
विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 10:05 PM