ब्राह्मणगाव : येथे बाजार चौकात सकाळी ९ वाजता सरपंच सरला राघो अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा संपन्न झाली .सभेत प्रथम ग्रामविकास अधिकारी पी. के. बागुल व पंचायत समिती निरीक्षक एस. एच. महाले यांनी पंतप्रधान आवास योजना ग्रामीण व इतर राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी लाभार्थींकडून आवश्यक ती कागदपत्रे प्राप्त करून घेणे तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी अर्थसाहाय्य योजनेंतर्गत ज्या पात्र लाभार्थींकडे घरकुल बांधण्यासाठी खासगी जागा उपलब्ध आहे अशा गरजू लाभार्थींना शासकीय जमीन उपलब्ध करून देणे याबाबत माहिती दिली. त्यावर उपस्थित ग्रामस्थांनी सखोल चर्चा करत लाभार्थी निवडीसाठी प्रत्यक्ष फिरून त्या कुटुंबाची अडचण समजून घ्यावी. अनेक लाभार्थी वंचित असल्यामुळे पुन्हा सर्व्हे करण्याच्या मागणीचा ठराव करण्यात आला.त्यानंतर माजी सरपंच सुभाष अहिरे यांनी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचा ठराव करून शासनाकडे पाठवावा, असे सांगितले. ज्येष्ठ नेते राघोनाना अहिरे यांनी ग्रामपंचायत थकीत व्यक्तींचे डिजिटल लावणार असल्याने त्वरित थकबाकी भरण्याचे आवाहन केले. पंचायत समिती सदस्य अतुल अहिरे यांनी घरकुलाचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवल्याचे सांगितले. गावातील सर्व अतिक्रमणे काढण्याच्या ठराव निंबा अहिरे यांनी मांडल्यावर ज्येष्ठ नेते यशवंत अहिरे यांनी त्यास पाठिंबा दिला, तर कसादपाडे- वस्तीसाठी लवकरच पाणी पोहचवण्याचे आश्वासन उपसरपंच गोटू पगार यांनी दिले.गावातील जाती-जमाती घटकांना ब्लॅँकेट वाटप व अपंग व्यक्तीला तीनचाकी सायकलचे वाटप सरपंच सरला अहिरे, पंचायत समिती सदस्य अतुल अहिरे, ज्येष्ठ नेते राघोनाना अहिरे, यशवंत अहिरे, ज्ञानदेव अहिरे, किरण अहिरे, विनोद अहिरे, कैलास अहिरे, सुभाष अहिरे, दत्तात्रेय खरे, अनिल खरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सरपंच सरला अहिरे यांनी आभार मानले. प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी पी. के. बागुल यांनी केले. (वार्ताहर)
ब्राह्मणगाव येथे विशेष ग्रामसभा
By admin | Published: April 21, 2017 11:45 PM