ठेंगोडा : येथील सूतगिरणीच्या शेतजमीन लिलावाबाबत चर्चा करण्यासाठी व ठोस निर्णय घेण्यासाठी गुरुवारी (दि. ११) ठेंगोडा ग्रामपंचायतीने तातडीची विशेष ग्रामसभा आयोजित केल्याची माहिती सरपंच सुनीता ठाकरे व ग्रामविकास अधिकारी ठोके यांनी दिली.नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने गिरणीकडील कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी मालेगाव दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता. या कर्जाच्या वसुलीसाठी न्यायालयाने थेट गिरणीच्या शेतजमिनीचा लिलाव करण्याचे आदेश दिले. स्वर्गीय आमदार पंडितराव धर्माजी पाटील यांनी स्थापन केलेली व एकेकाळी राज्यात दुसऱ्या क्र मांकाची सूतगिरणी असा लौकिक प्राप्त झालेल्या या गिरणीची अवस्था बिकट झाली आहे.याहूनही वाईट अवस्था गिरणीत कष्ट करणाऱ्या एक हजार कामगार व त्याच्या कुटुंबीयांची झाली आहे. आयुष्यभर काबाडकष्ट करून गिरणीला नावारूपास आणण्यासाठी जिवाचे रान केलेल्या गिरणी कामगारांच्या पदरात काहीच पडले नाही. कामगारांचे भविष्यनिर्वाह निधी, पेन्शन, ग्रॅच्युईटी असे सात कोटी रुपये गिरणीकडे आज घेणे आहेत. जिल्हा बँकेने त्यांच्या कर्जवसुलीसाठी कोर्टाचा आधार घेतला व शेतजमिनीचा लिलाव करून कर्जवसुलीचा मार्ग मिळवला. गिरणी कामगार मात्र आधीच दारिद्र्याच्या खाईत गेला आहे. या ग्रामसभेत ग्रामस्थ, कामगार व शेतकरी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)
ठेंगोडा ग्रामपंचायतीची उद्या विशेष ग्रामसभा
By admin | Published: February 09, 2016 10:59 PM