मालेगाव : शहरात १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीत खासगी आॅटोरिक्षांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी पत्रकान्वये कळविले आहे. खासगी संवर्गातील नोंदणी झालेल्या आॅटोरिक्षांना प्रवासी वाहतुकीचा परवाना नसतानाही त्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. अशी प्रवासी वाहतूक पूर्णत: बेकायदेशीर असून, अशा वाहनांचा अपघात झाल्यास यातील प्र्रवासी कोणत्याही विमा संरक्षणास पात्र राहत नाही. खासगी संवर्गात नोंदणी असणारी आॅटोरिक्षा नवीन परवान्यावर अथवा सध्याच्या परवान्यावर विहित शासकीय शुल्क अदा करून परिवहन संवर्गात (प्रवासी वाहतुकीसाठी) रुपांतरित करण्याची विभागाकडून पगरवानगी दिली होती. याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१७ होती.खासगी रिक्षाधारकांना आपला प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय नियमित करण्याची शासनाने संधी देऊनही खासगी रिक्षाधारकांनी या योजनेला प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिवहन मंत्र्यांच्या निर्देशान्वये शहरात खासगी रिक्षांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती बिडगर यांनी दिली. या मोहिमेंतर्गत खासगी संवर्गातील आॅटोरिक्षा प्रवासी वाहतूक करताना आढळून आल्यास वाहन जप्त करून चालकाविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या रिक्षा पोलीस ठाणे, एस.डी. डेपो, आरटीओ कार्यालय वा अन्यत्र अटकावून ठेवण्यात येतील. अशा चालकाकडून दंड वसूल करून वाहनाची नोंदणी व लायसन्स रद्द करण्यात येईल. मालेगाव कार्यक्षेत्रातील प्रवाशांनी खासगी आॅटोरिक्षातून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन पत्रकान्वये करण्यात आले आहे.
खासगी आॅटोरिक्षांची विशेष तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:10 AM