नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे खातेवाटप करण्यासाठी तसेच अन्य विषय समित्यांवर सदस्यांची निवड करण्यासाठी येत्या १६ एप्रिलला जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलावण्यात आली आहे.५ एप्रिलला त्या अनुषंगाने सर्व सदस्यांना बैठकीचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. अध्यक्ष शीतल सांगळे यांनी यासंदर्भातील सभेची तारीख निश्चित केली आहे. १६ एप्रिलला रविवार शासकीय सुटी असल्याने या दिवशी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आल्याने अधिकाऱ्यांना सुटीच्या दिवशी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी विशेष सभेची विषयपत्रिका सर्व सदस्यांना पोस्टाने पाठविण्याची सूचना विभागाला दिली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ, कृषी व पशुसंवर्धन तसेच शिक्षण व आरोग्य समित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष नयना गावित, सभापती मनीषा रत्नाकर पवार, यतिन पगार यांना या तीन समित्यांचे सर्वसंमतीने अथवा एकमत नसल्यास मतदानाने वाटप करण्यात येईल. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर शिवसेना व कॉँग्रेसचे पदाधिकारी विराजमान झाल्यावर विषय समिती सभापती पदांवर भाजपा-राष्ट्रवादीने कब्जा केल्याने विषय समिती खातेवाटपाबाबत सभागृहात नेमके काय घडते, यावरच खातेवाटप अवलंबून असेल. पुढील अडीच वर्षांच्या कामकाजाच्या दृष्टीने सर्व विषय समिती खातेवाटप आणि स्थायी समितीसह अन्य समित्यांवरील सदस्यांच्या निवडी एकमताने होण्याबाबत सर्वच राजकीय पक्षांची अनुकूलता लागणार आहे. (प्रतिनिधी)
१६ एप्रिलला विशेष सभा
By admin | Published: April 07, 2017 1:22 AM