शहरातील भटक्या श्वानांचा मोकाट फिरणारे जनावरे यामुळे शहरवासीय त्रस्त झाले असून या संदर्भात पालिकेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊ लागल्या होत्या.
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत उपनगराध्यक्ष सूरज पाटणी यांनी पालिकेला विशेष मोहीम राबविण्याची सूचना केली होती. त्यानुसार पालिकेने शहरात भटके कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत गटनेते प्रवीण बनकर, नगरसेवक डॉ. संकेत शिंदे, शिवसेना गटनेते दयानंद जावळे, रूपेश लोणारी यांच्या मागणीवरून स्वच्छता विभागाने भटके श्वान पकडण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने आठवड्यापूर्वीच विविध ठिकाणी नोटीस फलक लावून मोकाट श्वान व जनावरांचा बंदोबस्त करण्याची सूचना दिली होती. मात्र, अनेकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मंगळवारपासून टिळक मैदान परिसरातून भटके श्वान पकडण्याच्या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. मोहीमेत पकडलेले श्वान वाहनातून जंगलात सुरक्षितस्थळी सोडून दिले जाणार असल्याची माहिती स्वच्छता विभागप्रमुख सागर झावरे यांनी दिली आहे.