नाशिक : काम कोणतेही करीत असला तरी शिक्षण आणि नवनवीन गोष्टी शिकणो सोडू नका, मी पण सोडलेले नाही. शिक्षणातूनच महिलांना ख-या अर्थाने पुढे जाण्याचे मार्ग गवसणार आहेत, अशा शब्दात सर्वाची लाडकी आर्ची अर्थात रिंकू राजगुरु हिने उपस्थित महिला आणि मुलींसमोर शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले.
संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी ‘आर्ची’ आकर्षक साडी नेसून स्टेजवर अवतरताच सुरु झालेल्या ‘झिंगाट’वर तिने ठेका धरला आणि संपूर्ण मैदानातच त्या नृत्याची झिंग पसरली. निर्भया मॅरेथॉनच्या निमित्ताने नाशिकच्या रस्त्यावर धावलेल्या हजारो धावपटूंना रिंकूसह, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि अभिनेता जितेंद्र जोशी यांच्या उपस्थितीने उत्साहाला उधाण आले होते. येथील ठक्कर डोम मैदानावर रविवारी सकाळी निर्भया मॅरेथॉनला प्रारंभ झाला. 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर अशा टप्प्याटप्प्याने धावपटूंना सोडण्यात आले.
नाशिक पोलीसांच्या वतीने आयोजित या निर्भया मॅरेथॉनच्या शुभारंभप्रसंगी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, आयोजक आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, औरंगाबादचे डीआयजी आणि नाशिकचे माजी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल, जिल्हा पोलीस अधीक्षक आरतीसिंह यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते. महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक तसेच हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा मॅरेथॉन सोहळा उत्साहात पार पडला.
अर्ध मॅरेथॉनचे विजेते अर्ध मॅरेथॉनमध्ये महिलांच्या 18 ते 29 गटात आरती देशमुख आणि शीतल भंडारी यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय , 30 ते 39 गटात असा टी. पी.,ज्योती गवते, निवृत्ता दहावड आणि माधुरी काळे यांनी बाजी मारली. पुरुषांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये बबन चव्हाण,विनोद वळवी आणि सोनू नवरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. तर 30 ते 39 गटात विनायक ढोबळे, चंदर सिंग आणि बालाजी कांबळे यांनी बाजी मारली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.