लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक औष्णिक वीज केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व कामगारांना कोरोनाबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचना मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी दिल्या आहेत.
या संदर्भात नुकतीच अधिकारी व विभागप्रमुखांची बैठक घेण्यात येऊन त्यात खबरदारीचा उपाय म्हणून वसाहतीमधील कामगार व अधिकारी मनोरंजन केंद्र, तरणतलाव, पीस पार्क , मंदिर ही सर्व ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक, दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीज केंद्रास भेट देण्यासाठी येणा-या तांत्रिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या औद्योगिक भेटी रद्द करण्यात आल्या असून, कर्मचाऱ्यांनी व ठेकेदारांनी आपल्याकडील कामगारांची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कामावर येणा-या प्रत्येकाची इन्फ्रारेड थर्मामीटरने तपासणी करूनच सोडण्यात येत आहे. ठेकेदार व पुरवठादारांनी तसेच विविध कामांनिमित्त बाहेरगावाहून येणा-या अभ्यागतांना तातडीचे कामे वगळता आवश्यकता नसल्यास कार्यालयात येऊ नये त्याचबरोबर वीज उत्पादनाशी निगडीत कार्यालयीन कामे ही संबंधित विभागप्रमुख व अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी, दूरध्वनी, ई- मेल याद्वारे संपर्क साधून कामे मार्गी लावण्यात येत आहेत.