--------------------
वावी शाळेत वृक्षारोपण
सिन्नर: रयत शिक्षण संस्थेच्या वावी येथील नूतन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सदर उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या आवारात पिंपळ, वड व अन्य वृक्षांची लागवड करण्यात आली. मुख्याध्यापक कल्पना जगताप, हरित सेना प्रमुख सुहास गावित यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गुरुकुल प्रमुख मनोज महाजन, रावसाहेब म्हस्के, सुनील तांबेकर, शिवाजी सरोदे, कविता मावची, नीलिमा गावित, कैलास तडवी, रूपाली खवले, सविता चोबे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
--------------
महामार्गावर वर्दळ वाढली
सिन्नर: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने, महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्या वाढल्या असून, बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेकांना कोरोनाची भीती वाटत नसल्याने, गर्दीही गेली जात असल्याचे चित्र बस व अन्य ठिकाणी दिसून येत आहे.
------------
पूर्व भाग पावसाच्या प्रतीक्षेत
सिन्नर: राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती असतांना सिन्नरच्या पूर्व भागात पाऊस नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. अनेकांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या होत्या, तर अनेक शेतकऱ्यांनी उशिरा का होईना, पेरण्या केल्या आहे. मात्र, पूर्व भागात जोरदार पाऊस नसल्याने चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत चांगला पाऊस झाला होता. या वर्षी मात्र किरकोळ स्वरूपात पाऊस येत असल्याने खरिपाचे उत्पन्न मिळते की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
--------------
सिन्नरला आतापर्यंत ४४ हजार हेक्टरवर पेरण्या
सिन्नर: तालुक्यात या वर्षी अपेक्षित पाऊस नसल्याने, केवळ ७१ टक्केच क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत केवळ ४४ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे १८ हजार हेक्टर कमी आहे. पाऊस सुरू होऊन दोन महिने होत आले असताना, तालुक्यात आतापर्यंत केवळ १९९ मिमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे तालुक्यातील नदी-नाले कोरडेठाक आहेत.